घात झाला अन् गमावले 127320 कोटी रुपये; आज त्याच व्यक्तीकडून अदानी- अंबानींच्या श्रीमंतीवर मात, ओळखलं का?
एका दिवसात विश्वासघातामुळं विचारही करता येणार नाही इतकी श्रीमंती लयास गेली.... पण, या व्यक्तीनं पुन्हा उभारला सारा डोलारा. ओळखता येतोय का चेहरा?
Business News : जगभरातील व्यावसायिक आणि उद्योजकांची जेव्हाजेव्हा चर्चा होते तेव्हा काही नावं सातत्यानं समोर येतात. या नावांच्या क्रमात काहीसे बदल वगळले तर, मागील काही वर्षांपासून ही नावं यादीतून बाहेर जाताना दिसत नाहीयेत. (Gautam Adani, Mukesh Ambani) अदानी, अंबानी हीसुद्धा त्यातलीच नावं. पण, याच जगातील धनाढ्य मंडळींसाठी सप्टेंबर महिन्यातील पहिला शुक्रवार अनेक अडचणींचा ठरला. कारण, यावेळी जागतिक स्तरावरील अब्जाधीशांच्या संपत्तीमध्ये 134 अब्ज अमेरिकी डॉलरची एकत्रित घट पाहायला मिळाली.
सर्वाधिक तोट्यामुळं प्रभावित झालेल्या श्रीमंतांमध्ये येणारं एक नाव ठरलं ते म्हणजे जेफ बेजोस. (Amazon) अॅमेझॉनच्या शेअरमध्ये 8.8 टक्क्यांनी घट झाल्यानंतर बेजोस यांच्या संपत्तीचा एकूण आकडा जवळपास 15.2 अब्ज अमेरिकी डॉलर अर्थात साधारण ₹1,27,320 कोटी रुपयांनी कमी झाला. मागील दोन वर्षांमध्ये अॅमेझॉनकडून करण्यात आलेली ही सर्वात वाईट कामगिरी ठरली होती.
आर्थिक क्षेत्रातील कामगिरीमुळं अॅमेझॉनचं नुकसान झालं खरं. पण, हा बेजोस यांना झालेला सर्वात मोठा तोटा नव्हता. तर, 2019 मध्ये ज्यावेळी घटस्फोट झाला होता, तेव्हा त्यांना 36 अब्ज डॉलरचं नुकसान झालं होतं आणि हाच त्यांचा सर्वात मोठा तोटा ठरला.
जेफ बेजोस आज श्रीमंतांच्या यादीत विराजमान असले तरीही त्यांचं बालपण मात्र संघर्षमय दिवसांत गेलं. जेफ 17 महिन्यांचे असतानाच त्यांच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला होता. ज्यानंतर आईनं त्यांचं संगोपन केलं. जेफ यांचे अडॉप्टीव वडील मिगुएल बेजोस पदवी शिक्षण घेत अभियंते झाले तेव्हा त्यांचा हा संघर्ष संपला.
हेसुद्धा वाचा : कर्जात बुडालेल्या अनिल अंबानींना 'या' तरुणाचाच आधार; नावातच सर्वकाही, थोरल्या अंबानींना टक्कर देणारा हा आहे कोण?
फार कमी वयातच जेफ बेजोस यांनी तंत्रज्ञानामध्ये रुची दाखवण्यास सुरुवात केली. त्यांनी प्रिंसटन विद्यापीठातून शिक्षण घेत वॉल स्ट्रीटमध्ये काम सुरू केलं, जिथं त्यांना आर्थिक गोष्टींची माहिती झाली. 1994 मध्ये त्यांना ऑनलाईन सामान विक्रीची कल्पना सुचली आणि इथूनच त्यांनी घरातून अॅमेझॉनची सुरुवात केली. सुरुवातीला पुस्तकं आणि त्यामागोमाग इथं सामानविक्री सुरू करण्यात आली. सुरुवातीला या संकल्पनेला अनेकांनी गांभीर्यानं घेतलं नाही. पण, बेजोस धीरानं काम करत राहिले आणि अॅमेझॉनला यशाच्या शिखरावर पोहोचवलं.
अधिकाधिक पैसा कमवण्याचं स्वप्न दूर सारत बेजोस यांनी कंपनीला दीर्घकाळासाठी या शर्यतीत टिकवून ठेवण्यावर भर देत प्रयत्न सुरू केले. 2021 मध्ये त्यांनी या कंपनीच्या सीईओ पदाचा त्याग केला. सध्या या कंपनीची मालकी त्यांच्याकडेच असून, इथं ते अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावतात. जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवणारे जेफ बेजोस अगदी सहजपणे मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या श्रीमंतीवरही मात करताना दिसतात ते फक्त आणि फक्त त्यांच्या व्यवसाय कौशल्य आणि दूरदृष्टीमुळेच.... नाही का?