वय शंभरीला 7 कमी अन् संपत्ती एलॉन मस्कपेक्षा जास्त; कोण आहेत गडगंज श्रीमंती असणारे हे गृहस्थ?
World Richest Person : श्रीमंतांच्या यादीत एलॉन मस्कचं नाव आघाडीवर पण, तरीही हे शंभरीकडे झुकणारे गृहस्थ इतके पुढे कसे? पाहा...
World Richest Person : जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या नावांचा जेव्हाजेव्हा उल्लेख होतो किंवा ज्या निकषांवर ही श्रीमंतांची यादी बदलत असते तेव्हातेव्हा काही नावं सातत्यानं या यादीच समाविष्ट झाल्याचं पाहायला मिळतं. अशा या यादीत जागतिक स्तरावर आघाडीवर असणारं एक नाव म्हणजे टेस्लाची सूत्र हाताळणारा एलॉन मस्क.
मस्कच्या श्रीमंतीविषयी काहीच वेगळं सांगण्याची गरज नाही. पण, आता मस्कलाही आश्चर्यच वाटेल अशी एक बाब नुकतीच समोर आली आहे. ती म्हणजे, त्याच्याहूनही अधिक रोकड जमा असणारी एक व्यक्ती. जगभरातील शेअर बाजारांमधील गुंतवणूकदार सध्या 93 वर्षीय वॉरन बफे यांच्या कंपनीकडे जमा झालेली रोकड पाहून हैराण झाले आहेत. बफे सातत्यानं होल्डिंग कमी करून कॅश रिजर्व्ह वाढवण्यावर भर देत आहेत. सध्या ही रोकड इतकी वाढली आहे, की त्याच्या आकडेवारीपुढं जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्कचं ऐश्वर्यही फिकं पडलं आहे.
हेसुद्धा वाचा : ही तर धनलक्ष्मी; लेकीच्या शिक्षणात अडचण येताच मुकेश अंबानींनी सुरू केली नवी कंपनी; आज अग्रस्थानी झेप...
फोर्ब्सच्या रिअलटाईम बिलेनियर्स लिस्टमधून समोर आलेल्या आकडेवारीनुसार मस्क सध्या 243.7 बिलियन डॉलर इतक्या संपत्तीसह श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. तर, ब्लूमबर्गच्या माहितीनुसार 239 बिलियन डॉलर इतक्या संपत्तीसह तो श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी आहे. तर, वॉरन बफे यांच्या संपत्तीचा आकडा 139 बिलियन डॉलर असून ते ब्लूमबर्गच्या यादीत 9 व्या स्थानावर आहेत. रोकडीच्या बाबतीत मात्र बफे सर्वांनाच मागे टाकून अव्वल स्थानी पोहोचले आहेत हे खरं.
वॉरन बफे यांच्याकडे किती रोकड?
जून महिन्याची तिमाही संपेपर्यंत वॉरन बफे यांची कंपनी बर्कशायर हाथवे 276.9 बिलियन डॉलर म्हणजे 23250 अब्ज रुपये इतकी रोकड बाळगत आहे. हा आकडा बर्कशायर हाथवेटच्या एकूण संपत्तीच्या 25 टक्के इतका आहे. बफे यांच्या एकूण संपत्तीमध्ये रोकडीचा मोठा भाग यापूर्वी 2005 मध्ये पाहायला मिळाला होता, हा तेव्हाचा काळ होता ज्यावेळीही त्यांनी होल्डिंग कमी करून रोकडीवर भर दिल्याचं पाहायला मिळालं होतं.