ब्युरो रिपोर्ट : कोरोना व्हायरस ज्या देशातून सुरु झाला त्या चीनमध्ये सोमवारी प्रथमच कोरोनाचा एकही बळी गेला नाही. जानेवारीपासून प्रथमच ६ एप्रिल रोजी म्हणजे तब्बल तीन महिन्यांनी चीनमध्ये कोरोना मृत्युची नोंद झाली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनच्या वुहान शहरात कोरोनाचा विषाणू निर्माण झाला आणि हळहळू जगभरात तो फैलावला. जगभरात रुग्णांची संख्या आता साडेतेरा लाखांच्या जवळ पोहचली असून मृतांचा आकडाही ७५ हजारांच्या जवळ पोहचला आहे. युरोप आणि अमेरिकेत कोरोनाचा कहर सुरु असताना चीन मात्र कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होत आहे.


चीनमध्ये तब्बल ८१ हजार ७४० जणांना कोरोनाची लागण झाली आणि त्यापैकी ३ हजार ३३१ जणांचा मृत्यू झाला. ८१ हजार ७४० रुग्णांपैकी ७७ हजार १६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सोमवारी चीनमध्ये कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही, मात्र ३२ नवे रुग्ण आढळले. हे सगळे बाहेरून आलेले रुग्ण आहेत, अशी माहिती चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानं दिली आहे. चीनमध्ये आता कोरोनाचे ४५७३ रुग्ण आहेत.


चीनमध्ये फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा कहर सर्वाधिक होता. १० फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी दरम्यान चीनमध्ये रोज मृतांचा आकडा शंभरावर गेला होता. २३ फेब्रुवारीला सर्वाधिक १५० रुग्णांचा मृत्यू झाला होता. मात्र चीननं कोरोनावर नियंत्रण मिळवलं आहे.


 



दरम्यान, चीनच्या ज्या वूहान शहरातून कोरोना व्हायरस पसरला त्या शहरात जानेवारीमध्ये केलेले लॉकडाऊन आठवडाभरापूर्वी शिथिल करण्यात आले आहे. रेल्वे सेवा आणि अन्य कारभारही पुन्हा रुळावर येऊ लागला आहे. चीनमध्ये लॉकडाऊन शिथिल केलं असलं तरी नागरिक मास्क लावूनच बाहेर पडतात आणि सोशल डिस्टसिंग पाळणंही सर्वांना बंधनकारक आहे. ८ एप्रिलला वूहानमधील लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्यात येणार आहे.