नवी दिल्ली - नियंत्रण रेषा ओलांडून बालकोटमध्ये भारतीय हवाई दलाने जैश ए मोहम्मदच्या तळांवर मंगळवारी पहाटे हल्ला केला. या हल्ल्यात जैशचे दहशतवादी प्रशिक्षण तळ उदध्वस्त करण्यात आले.  सुमारे ३०० दहशतवादी या हल्ल्यात मारले गेले आहेत. या हल्ल्यानंतर चीनने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी संयम राखावा, अशी प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केली आहे. दोन देशांमधील संबंध आणि सहकार्य यांच्या आधारावरच दक्षिण आशियामध्ये शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित होऊ शकते, असे त्यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१४ फेब्रुवारी रोजी पुलवामामधील अवंतीपोराजवळ जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्याने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर आत्मघाती हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाचवेळी जवान शहीद होण्याची ही पहिलीच घटना होती. या हल्ल्यानंतर देशभरात दहशतवाद्यांविरोधात चीड निर्माण झाली. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पहाटे नियंत्रण रेषेपलीकडे बालकोटमध्ये जैश ए मोहम्मदच्या तळांवर हवाई हल्ले केले. जवळपास चार दशकांनंतर भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषा ओलांडून कारवाई केली आहे. या हल्ल्यामुळे पाकिस्तानला मोठी चपराक बसली आहे. त्या पार्श्वभूमीवर चीनने भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. पाकिस्तानने या हल्ल्याचा प्रतिकार केला जाईल, असे म्हटल्यानंतर चीनने दोन्ही देशांना संयम बाळगावा, अशी प्रतिक्रिया दिली आहे. 


जैशच्या दहशतवाद्यांकडून भारतात हल्ले घडवून आणण्याची योजना होती. त्यासाठी आत्मघाती हल्ले करू शकणाऱ्या दहशतवाद्यांना भारतात पाठविण्यात येणार होते. त्याचा प्रतिकार करण्यासाठीच भारताकडून ही कारवाई करण्यात आली, असे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. भारताने केवळ दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे. सामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.