बीजिंग : वादग्रस्त दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या कृत्रिम बेटाजवळ अमेरिकेची युद्धनौका रेंगाळल्याने चीनने नाराजी व्यक्त केलीये. तसेच चीनच्या नौदलाने अमेरिकेला ही युद्धनौका हटवावी अशी चेतावणी दिलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता जेन शुआंग म्हणाले, यूएसएस जॉन एस मॅक्केन युद्धनौकाने चीन आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केलेय. तसेच देशाचे सार्वभौमत्व आणि सुरक्षेला नुकसान पोहोचवलेय. 


दरम्यान, अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सागरी संचार कायद्यानुसार यूएसएस जॉन एस मॅक्केन ही युद्धनौका मिसचीफ रीफपासून सहा मैल अंतरावरुन गेली होती. 


चीनने या कृत्रिम बेटाची निर्मिती केलीये. मिसचीफ रीफ हा भाग वादग्रस्त स्पार्टले बेट समूहातील एक हिस्सा आहे. यावर चीन तसेच शेजारील देश त्यावर आपापला मालकी हक्क गाजवत आहेत. 


नाव न सांगण्याच्या अटीवर अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने एएफपीला याबाबत माहिती दिलीये. या माहितीनुसार, चीनच्या युद्धनौकेने यूएसएस जॉन एस मॅक्केनला कमीत कमी १०वेळा रेडिओवरुन चेतावणी दिली होती. कृपया तुमची नौका वळवा. तुम्ही आमच्या सागर क्षेत्रात आला आहात, असा संदेश चीनच्या युद्धनौकेकडून दिला जात होता. 


जानेवारीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सागरी संचार स्वतंत्रता अभियानांतर्गत घडलेली तिसरी घटना आहे.