चीन डार्क मॅटरचं कोडं सोडवणार; जमिनीच्या पोटात 2400 मीटर खोल प्रयोगशाळा
चीनने जगातील सर्वात मोठी भूमिगत प्रयोगशाळा सुरु केली आहे. प्रयोगशाळेत अनेक रहस्यांचा उलगडा होणार आहे.
China Jinping Underground Laboratory : चीनने जगातील सर्वात खोल आणि सर्वात मोठी भूमिगत प्रयोगशाळा तयार केल्याची माहिती समोर आलीय. चिनी वैज्ञानिकांनी या प्रयोगशाळेत कामही सुरू केलंय. या प्रयोगशाळेत नेमके कोणते प्रयोग सुरू आहे. भूमिगत प्रयोगशाळेमागचा चीनचा उद्देश काय? जाणून घेवूया.
चीन हा जगातील असा देश आहे, जो आपल्या महत्वाकांक्षेपायी काय करेल याचा नेम नाही. त्यामुळेच चीन सातत्याने प्रयोग करत असतो, आताही चीनने भूमिगत प्रयोगशाळेच्या माध्यमातून साऱ्या जगाला आश्चर्यचा धक्का दिलाय. चीनच्या दक्षिण-पश्चिम सिचुआन प्रांतात 2400 मीटर खोल ही प्रयोगशाळा तयार करण्यात आलीय. या प्रयोगशाळेत नेमकं काय सुरू आहे, हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र या प्रयोगशाळेत अनेक रहस्यांचा उलगडा होणार असल्याचा दावा केला जातोय. विशेष म्हणजे, चीनची चंद्रावर नजर आहे. रशिया आणि चीनने चंद्रावर आपला बेस बांधण्याबाबत वक्तव्ये केली आहेत. अशा परिस्थितीत चीनला एवढी खोल लॅब बांधण्याची गरज का पडली आणि या भूमिगत प्रयोगशाळेत कोणते काम सुरू आहे, याबाबत चर्चा सुरू झालीय.
या प्रोगशाळेच्या माध्यमातून चीन जगातील सर्वात मोठं रहस्य उलगडणार
या भूमिगत लॅबमध्ये अल्ट्रा लो रेडिएशन बॅकग्राउंडची सुविधा आहे. चिनी शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, बऱ्याच काळापासून 'डार्क मॅटर' एक रहस्य राहिले आहे. त्याबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध आहे. या नवीन प्रयोगशाळेमुळे डार्क मॅटरशी संबंधित प्रश्नांची उत्तरे मिळण्यास मदत होईल. या प्रयोगशाळेला जिनपिंग लॅब असे नाव देण्यात आले आहे. डार्क मॅटर असा पदार्थ आहे, ज्यात कोणतीही ऊर्जा किंवा प्रकाश नसतो. त्यामुळे हा पदार्थ शोधणे कठीण आहे.
चीनचा आजवरचा इतिहास पहिला तर अशा प्रयोगशाळांच्या माध्यमातून चीन केवळ कट कारस्थान करत आलाय. कोरोनाचा जन्म झाला तो याच चीनमध्ये आणि आता गूढ न्यूमोनियाचा कहर सुरू आहे तोही चीनमध्येच त्यामुळे चीनच्या भूमिगत प्रयोगशाळेत काही काळंबेरं तर शिजत नाही ना असा संशय निर्माण होणे स्वाभाविक आहे.