वुहान :  संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या Coronavirus कोरोनामुळे प्रभावित झालेल्या चीन या देशातील वुहान भागातून आता अतिशय महत्त्वाची माहिती समोर येत आहे. ज्या ठिकाणहून सर्वाधिक दहशत पसरवणाऱ्या कोरोना विषाणूची लागण होण्यास सुरुवात झाली त्याच वुहान शहरात आता निर्मनुष्य असणाऱ्या रस्त्यांवर पुन्हा एकदा माणसांची रहदारी दिसण्यास सुरुवात होत आहे. अतिशय धीम्या गतीने पण, तितक्याच सकारात्मकतेने वुहान पुन्हा एकदा पूर्वपदावर येऊ पाहत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जवळपास दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर वुहानमध्ये शनिवारपासून मेट्रो सेवा पुन्हा सुरु करण्यात आली होती. त्यामागोमाग आता या भागाच्या सीमासुद्धा खुल्या करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणूने या भागात मोठी दहशत पसरवलेली असतानाच आता, पूर्वपदावर येणारं जनजीवन पाहता वुहानमधील नागरिकांसाठी आणि संपूर्ण जगासाठीही ही दिलासादायक बातमी आहे. 


डिसेंबर महिन्याच्या सुमारास या ठिकाणी सर्वप्रथम कोरोनासंदर्भातील माहिती समोर आली. ज्यानंतर त्याचा प्रादुर्भाव वाढत गेला. सध्याच्या घडीला या विषाणूने जगभरातील अनेक देशांना आपल्या विळख्यात घेतलं आहे. दोन महिन्यांपूर्वी वुहाननेही अशाच किंबहुना अतिशय वाईट परिस्थितीचा सामना केला होता, ज्यामध्ये शहराचा देशाशी असणारा संपर्क लॉकडाऊनमुळे पूर्णत: तुटला गेला होता. दरम्यान, येथी जनजीवन आणि वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत असली तरीही नागरिक सतर्कता बाळगून असल्याचंही पाहायला मिळत आहे.


 


चीनमधील कोरोनाग्रस्तांपैकी जवळपास ६० टक्क्यांहून अधिक रुग्ण हे वुहान प्रांतातील होते. पण, अतिशय काटेकोरपणे नागरिकांना लॉकडाऊनचं पालन करत कोरोनावर मात केली. सध्याच्या घडीला कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांचीही येथे विशेष काळजी घेतली जात आहे. वुहानमधील सुधारणारी परिस्थिती ही तेथील नागरिकांमध्ये असणारी सतर्कता आणि स्वयंशिस्तीचा परिणामच आहे, असं म्हणायला हरकत नाही. मुख्य म्हणजे भारतात आणि जगभरातील इतर देशांमध्येही आता अशाच प्रकारच्या स्वयंशिस्तीनेच कोरोनावर मात करणं शक्य होणार आहे.