केवळ ३ मिनिटांतच १० हजार कोटींची कमाई, `या` कंपनीने बनवला रेकॉर्ड
चीनमधील ई-कॉमर्स कंपनी अलिबाबाने यंदाच्या वर्षी सिंगल्स डे सेलमध्ये रेकॉर्डब्रेक विक्री केली आहे. सिंगल्स डे सेलच्या दिवशी कंपनीने आपला स्वत:चाच रेकॉर्ड तोडला आहे.
नवी दिल्ली : चीनमधील ई-कॉमर्स कंपनी अलिबाबाने यंदाच्या वर्षी सिंगल्स डे सेलमध्ये रेकॉर्डब्रेक विक्री केली आहे. सिंगल्स डे सेलच्या दिवशी कंपनीने आपला स्वत:चाच रेकॉर्ड तोडला आहे.
यंदाच्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या इव्हेंटच्या माध्यमातून कंपनीने १.६४ लाख कोटी रुपये (२५.३ अरब डॉलर) ची विक्री केली आहे. चीनमध्ये ११ नोव्हेंबर हा दिवस सिंगल्स डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. याचा ट्रेंड १९९० पासून सुरु झाला त्यानंतर हा ट्रेंड युवकांमध्ये खूपच प्रसिद्ध झाला.
केवळ तीन मिनिटांत ९.८ कोटींची विक्री
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एका दिवसाच्या या इव्हेंटमध्ये अलिबाबा कंपनीने केवळ एका तासातच ६५ हजार कोटी रुपये (१० अरब डॉलर)ची विक्री केली. सुरुवातीच्या ३ मिनिटांतच १.५ अरब डॉलर म्हणजेच जवळपास ९.८ हजार कोटी रुपयांची विक्री झाली होती.
तर, गेल्यावर्षी इतकीच विक्री ही ६ मिनिट ३ सेकंदांत झाली होती. त्यामुळे कंपनीने यंदाच्या वर्षी केलेल्या विक्रीने आपला स्वत:चाच रेकॉर्ड तोडला आहे.
चीनमध्ये सर्वात मोठा कार्यक्रम
अलिबाबाचे को-फाऊंडर आणि उपाध्यक्ष जोसफ तसाई यांनी सांगितले की, "चीनच्या अर्थव्यवस्थेसाठी हा खूप मोठा कार्यक्रम आहे. सिंगल्स डे शॉपिंग एक स्पोर्ट तसेच एक इटरटेन्मेंटचा कार्यक्रम आहे. चीनमध्ये मध्यमवर्गीय ग्राहकांची संख्या ३० कोटींहून अधिक आहे त्यामुळे कंपनीची ऑनलाईन विक्री अधिक होत आहे".
अॅमेझॉनच्या सेलपेक्षा १८ पटींनी वाढली विक्री
अलिबाबा कंपनीने दावा केला आहे की, आतापर्यंतच्या सेलनुसार सिंगल्स डे अॅमेझॉनच्या प्राईम-डे सेलपेक्षा १८ पटींनी मोठी विक्री आहे.