Rahul Gandhi in US: काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. यादरम्यान राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्रकमधून वॉशिंग्टन ते न्यूयॉर्क (Washington to New York) असा 190 किमींचा प्रवास केला. यावेळी त्यांनी ट्रकचालक तेजिंदर गिल (Tejinder Gill) याच्याशी चर्चा केली. राहुल गांधी यांनी ट्रक चालकासह केलेल्या संभाषणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यादरम्यान राहुल गांधी यांनी त्याला किती कमाई करतोस अशी विचारणा केली. त्यावर ट्रकचालकाने जे उत्तर दिलं ते ऐकून राहुल गांधी यांना आश्चर्याचा धक्का बसला. राहुल गांधींनी यावेळी सिद्धू मूसेवाला (Siddhu Moosewala) याचं गाणंही ऐकलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधी यांनी याआधी पंजाबमध्येही ट्रक यात्रा केली होती. त्यावेळी त्यांनी अमृतसरमध्ये ट्रकचालकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. आता राहुल गांधी अमेरिकेत असून तिथेही त्यांनी ट्रकचालकांशी संवाद साधला. राहुल गांधी ट्रक चालकाच्या शेजारी बसून प्रवास केला. यावेळी राहुल गांधी म्हणाले की "भारताच्या तुलनेत येथील ट्रक जास्त आरामदायक आहेत. चालकांचा विचार करत हे ट्रक तयार करण्यात आले आहेत. भारतातील ट्रक मात्र चालकांच्या आरामदायक प्रवासाचा विचार करत नाहीत. हे ट्रक त्यांच्यासाठी तयार केलेलेच नाहीत".


यावेळी तेजिंदर गिलने सांगितलं की, येथील ट्रकमध्ये सुरक्षेची जास्त काळजी घेण्यात आली आहे. येथे कधीही पोलीस त्रास देत नाहीत. तसंच चोरीची भीती वाटत नाही. पण जर वेगमर्यादा ओलांडली तर मात्र चलान कापलं जातं. 


किती कमावतोस? राहुल गांधींची विचारणा


राहुल गांधींनी ट्ररक चालवून किती कमाई करतोस? अशी विचारणा केली असता तेजिंदर गिलने सांगितलं की, अमेरिकेत ट्रक चालवत तुम्ही सहजपणे 4 ते 5 लाख रुपये कमावू शकता. आपला ट्रकवाला आरामशीर 8 ते 10 हजार डॉलर कमावतो. म्हणजेच भारतीय पैशांमध्ये हा आकडा 8 लाख आहे. हे ऐकल्यानंतर राहुल गांधींनाही आश्चर्याचा धक्का बसतो. किती...8 लाख रुपये असं ते आश्चर्याने विचारतात. त्यावर चालक सांगतो की, या क्षेत्रात पैसा खूप आहे. ज्या लोकांना गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. 



दरम्या राहुल गांधी यांनी तेजिंदर गिलला भारतीय ट्रकचालकांना काय संदेश देऊ इच्छितोस? असं विचारलं असता त्याने म्हटलं की, तुम्ही लोक फार  कठीण काम करत आहात. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही लोक फार मेहनत घेत असून कुटुंबापासून दूर राहता. येथे ट्रक चालवून कुटुंबाचा चांगला सांभाळ करु शकतो. पण भारतात हे फार कठीण आहे. 


राहुल गांधी यावेळी सांगतात की, भारतात चालकांच्या मालकीचा ट्रक नसतो. ट्रक दुसऱ्याचा असतो आणि ते चालवत असतात. त्यावर तेजिंदर गिल सांगतो की, येथे पैशांची कमकरता नाही. बँकेतून कर्ज काढत डाऊन पेमेंटवर ट्रक विकत घेता येतो. भारतात कर्ज काढण्यासाठी संपत्तीची कागदपत्रं लागतात. गरिबाकडे ही कागदपत्रं नसतात, यामुळे ते दुसऱ्याचा ट्रक चालवतात. 


तेजिंदर गिल यावेळी राहुल गांधी यांना गाणं लावू का? असं विचारतो. त्यावर राहुल गांधी हो म्हणतात. त्यावर ट्रकचालक म्हणतो, आमची विनंती आहे. सिद्धू मूसेवाला काँग्रेस कार्यकर्ता होता. त्याला न्याय मिळाला नाही. त्यावर राहुल गांधी हो नक्की त्याचं गाणं लावा सांगतात.