विमानात लवकरच Adult Only Zone! जाणून घ्या काय असणार खास या झोनमध्ये
Adult Only Zone On Flights: कंपनीने यासंदर्भातील घोषणा केली असून लवकरच ही सेवा ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे. मात्र हे `ओन्ली अडल्ट` सेशन कसं वेगळं असणार आहे ठाऊक आहे का?
Adult Only Zone On Flights: एका तुर्कीश-डच विमान कंपनीने आपल्या विमानांमध्ये 'ओन्ली अडल्ट' झोनची तयार करण्याची घोषणा केली आहे. हा झोन खास त्या व्यक्तींसाठी असेल ज्यांना प्रवासादरम्यान लहान मुलांच्या रडण्याचा किंवा किंकाळण्याचे आवाज ऐकण्याची इच्छा नसेल. 16 वर्षांहून अधिक वयाच्या प्रवाशांना या 'ओन्ली अडल्ट' फ्लाइटच्या झोनमधून प्रवास करता येणार आहे. या झोनमधून प्रवास करणाऱ्यांना निवांत झोपण्याबरोबरच चित्रपट पाहतही प्रवासाचा आनंद घेता येईल. या झोनला 'ओन्ली अडल्ट' झोन म्हटलं असलं तरी याला चाइल्ड-फ्री झोन असंही काही लोकांकडून म्हटलं जात आहे.
टीकेची झोड
अनेक विमान कंपन्या वेगवेगळ्या नावे अशी सेवा सुरु करत आहे. या सेवांअंतर्गत मुलांबरोबर प्रवास करणाऱ्यांसाठी वेगळी आसनव्यवस्था केली जाते. मुलांचं रडगाणं ऐकण्याऐवजी निवांत प्रवासाला प्राधान्य देणाऱ्या या पर्यायाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. काही तासांसाठी मुलांचं रडणं ऐकणं हे एवढं मोठं टास्क आहे का असा प्रश्न काहीजण विचारत आहेत. अतिरिक्त पैसा देऊन मुलांपासून दूर पळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. 'ओन्ली अडल्ट' झोनमधील भाग आणि सर्वसामान्य सिटींगदरम्यान भिंतीसारख्या पार्टीशनच्या माध्यमातून वेगळा केला जाणार आहे. या झोनमध्ये शांततेत प्रवास करता येईल.
लहान मुलांचा रडण्याच्या आवाजावरील संशोधन काय सांगतं
लहान मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकून अनेकांना डोकेदुखीचा त्रास होतो. लहान मुलांच्या रडण्याच्या आवाजाकडे दुर्लक्ष करता येत नाही. वैज्ञानिक संशोधनामधूनही हे सिद्ध झालं आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातील वैज्ञानिक केटी यंग यांनी केलेल्या एका अभ्यासामध्ये लहान मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकल्याने मेंदूवर काय परिणा होतो याचा अभ्यास करण्यात आलेला. यामध्ये कोणाच्याही रडण्याचा आवाज हा व्यक्तींना व्यथित करतो असं निरिक्षण समोर आलं. रडण्याचा आवाज ऐकल्याने मेंदूमधील मज्जासंस्थांसंदर्भातील प्रतिसाद वाढतो असं दिसून आलं. लहान मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकल्यावर 100 मिलीसेकंदांमध्ये मेंदूमधील प्रतिसादावर याचा परिणाम जाणवतो. एवढा वेगवान प्रतिसाद इतर कोणत्याही आवाजाला मेंदू प्रतिसाद देत नाही. पालक नसलेल्या व्यक्तींसंदर्भातही असेच घडते असं संशोधनामध्ये दिसून आलं.
लहान मुलांना रडताना ऐकल्यानंतर नक्की काय घडतं
लहान मुलांचा रडण्याचा आवाज ऐकल्यावर मेंदूमधील सबकॉर्टिकल नावाचा भाग सक्रीय होतो. या भागामध्ये मेंदूतील शॅलेमस, बेसल गेंगलिया आणि सेरिबेलमसारख्या भागांचा समावेश असतो. एखादं संकट आल्यानंतरच हे सर्व भाग एकाच वेळेस सक्रीय होतात. घडतंय त्याचाविरुद्ध लढा अथवा पळ काढा असा संदेश यामाध्यमातून दिला जातो. कारचा आवाज किंवा धोक्याला अलार्म ऐकल्यानंतरही असाच प्रतिसाद दिला जातो. यामध्ये हृदयाची धडधड वाढणे, घाम येणे आणि अस्वस्थ वाटणे यामाध्यमातून शरीर प्रतिसाद देतं.