Corona: आणखी एका देशाची भारतावर बंदी, 10 दिवस विमान सेवा केली बंद
भारतात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने अनेक देशांनी आतापर्यंत भारतातून येणाऱ्या लोकांवर बंदी घातली आहे. त्यात आणखी एका देशाची भर पडली आहे.
मुंबई : भारतात कोरोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. ब्रिटनने भारताला रेड लिस्टमध्ये टाकलं आहे. दुसरीकडे अमिरातने गुरुवारी घोषणा केली की, दुबई ते भारत दरम्यानची सर्व उड्डाणे 10 दिवस बंद राहणार आहेत. 25 एप्रिलपासून पुढील दहा दिवस भारत आणि दुबई दरम्यान त्यांची उड्डाणे चालणार नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे.
फ्रान्सने देखील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी भारतातून येणाऱ्या पर्यटकांवर प्रवेशबंदी लागू करणार आहे. बुधवारी एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. यापूर्वी ब्राझील, अर्जेंटिना आणि चिली येथून येणाऱ्या पर्यटकांनाही बंदी घातली गेली आहे.
शनिवारपासून भारतीय पर्यटकांच्या प्रवेशावर नवीन निर्बंध घालण्यात येणार आहे. सरकारचे प्रवक्ते गॅब्रिएल अटाल यांनीही याची पुष्टी केली की फ्रान्स 3 मेपासून देशांतर्गत प्रवासावरील बंदी उठवेल, परंतु रात्रीचे कर्फ्यू संध्याकाळी सात ते पहाटे सहा पर्यंत कायम राहील.
ते म्हणाले की, एप्रिलच्या सुरूवातीला लॉकडाऊनपासून बंद असलेली अनावश्यक वस्तूंची दुकाने मेच्या मध्यापूर्वी उघडता येणार नाहीत. कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी फ्रान्सने या महिन्याच्या सुरुवातीस ब्राझीलमधून येणारी विमान सेवा तात्पुरती थांबविली होती.