कोरोना रिटर्न्स! `या` देशात कोरोनाचा कहर वाढला, एका दिवसात सर्वाधिक मृत्यूची नोंद
कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याने स्थानिक सरकार तसंच जगातील इतर देशांची चिंता वाढली आहे
मॉस्को: कोरोना (Corona) प्रादुर्भावाचा कहर पुन्हा एकदा वाढू लागला आहे. रशियातील (Russia) मृतांच्या संख्येने आतापर्यंतचा विक्रम मोडला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कोरोनाच्या गामा व्हेरिएंटने (Gama Veriant) रशियात थैमान घातलं आहे. यापूर्वी ब्राझीलमध्ये (Brazil) गामा व्हेरिएंट सापडला होता. रशियामध्ये कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ झाल्याने स्थानिक सरकार तसंच जगातील इतर देशांची चिंता वाढली आहे.
एकाच दिवसात सर्वाधिक मृत्यूची नोंद
रशियात कोरोनामुळे एकाच दिवसात 808 लोकांचा मृत्यू झाला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, रशियामध्ये कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 6,534,791 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे 5,828,972 लोक बरे झाले आहेत तर एकूण 168,049 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
खरा आखडा अधिक असू शकतो
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आकड्यांच्या यादीत रशिया जगातील सहावा सर्वाधिक प्रभावित देश आहे. परंतु तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार खरी आकडेवारी आणखी जास्त असू शकते. द मॉस्को टाईम्सच्या एका रिपोर्टनुसार जूनपर्यंत रशियाच्या मृत्यूची संख्या 531,000 च्या वर होती हा जगातिल सर्वाधिक आकड्यांपैकी एक आहे. रशियाच्या कोविड -19 टास्क फोर्सने गुरुवारी 21,932 नवीन कोविड -19 प्रकरणांची पुष्टी केली.
लसीकरणाचा वेग संथगतीने
रशियाच्या मीडिया रिपोर्टनुसार, लसीकरण मोहिमेची संथ गती देखील तेथे कोरोना संसर्ग वाढण्याचं एक कारण आहे. आज (गुरुवार) पर्यंत, केवळ 19.7% नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. रशियामध्ये कोरोनाच्या चार लसींची नोंदणी करण्यात आली आहे. 'स्पुतनिक व्ही' ही रशियाची प्रमुख लस आहे.
पाकिस्तानातही कोरोनाचा कहर
दुसरीकडे, शेजारील पाकिस्तानातही कोरोनाचा कहर सुरूच आहे. तीन महिन्यांनंतर अचानक पाकिस्तानात मृतांचा आकडा 100 च्या पुढे गेला आहे. इथे गेल्या चोवीस तासात एकूण 102 लोकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानमध्ये मृतांचा आकडा 24,187 वर पोहोचला आहे.