वुहानमध्ये पुन्हा कोविडचे रुग्ण सापडल्याने सर्वांचीच कोरोना टेस्ट
कोरोनाचे संकट कायम असल्याचे दिसून येत आहे. वुहानमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण सापडल्याने भीती व्यक्त होत आहे.
बीजिंग : कोरोनाचे संकट कायम असल्याचे दिसून येत आहे. चीनमधील ज्या वुहान शहरातून कोरोनाचा फैलाव झाला. त्याच वुहानमध्ये कोरोनावर मात करण्यात आली होती. कोरोनाचा एकही रुग्ण नसताना पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे धास्ती वाढली आहे. चीनच्या वुहान शहरात ३६ दिवसानंतर पुन्हा कोरोनाचे सहा रुग्ण आढळून आल्याने तेथील आरोग्य प्रशासनाने शहरातील सर्व नागरिकांची कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
चीनच्या हुबेई प्रांतात असलेल्या वुहान शहराची लोकसंख्या १ कोटी १० लाखाच्या घरात आहे. याच शहरापासून कोरोना जगभर पसरला. मागील महिन्यात कोरोनाला रोखण्यात चीनला यश आले होते. मात्र, ३६ दिवसानंतर वुहानमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार सुरु झाला आहे. कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने भीती व्यक्त होत आहे. वुहानमधील कोरोनाची दुसरी लाट असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे वुहानमधील प्रत्येक जिल्ह्याने दहा दिवसांच्या आत योजना आखून सर्व नागरिकांची चाचणी करावी, असे तेथील आरोग्य प्रशासनाने काढलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.
आतापर्यंत चीनमध्ये ८२ हजार ८२६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ४६३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील ३६ दिवसांपासून तिथे कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नव्हता. काही दिवसांपूर्वी वुहानमधील एका भागात कोरोनाचा एक रुग्ण आढळला. त्यानंतर रविवारी पुन्हा पाच नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाचा धोका कायम असल्याचे दिसून येत आहे.