कोरोनाची नुकसान भरपाई द्या! जर्मनीचं चीनला १३० अब्ज युरोचं बिल
जगभरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातल्यानंतर आता चीनकडे बहुतेक देश संशयाच्या नजरेतून बघत आहेत.
बर्लिन : जगभरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातल्यानंतर आता चीनकडे बहुतेक देश संशयाच्या नजरेतून बघत आहेत. ब्रिटन, फ्रान्स आणि अमेरिकेच्या सुरात सूर मिसळत जर्मनीनेही चीनवर आरोप केले आहेत. एवढच नाही तर जर्मनीने चीनला नुकसान भरपाई म्हणून १३० अब्ज युरोचं बिलही पाठवलं आहे. जर्मनीतल्या स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार जर्मनीने कोरोनावरून चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यावर टीका केली आहे. तसंच चीनने जगाला धोक्यात टाकल्याचा आरोपही जर्मनीने केला आहे.
कोरोना व्हायरसमुळे जर्मनीचं १३० अरब युरोचं नुकसान झालं आहे. या संपूर्ण नुकसानीची यादीच जर्मनीमधलं प्रसिद्ध वृत्तपत्र 'बिल्ड'मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार जर्मनीतल्या प्रत्येक व्यक्तीचं १,७८४ युरोचं नुकसान झालं आहे. तसंच जर्मनीच्या जीडीपीमध्येही घट झाली आहे.
जर्मनीने अशाप्रकारचं बिल पाठवल्यानंतर चीनचा मात्र तिळपापड झाला आहे. जर्मनीने उचललेलं हे पाऊल म्हणजे राष्ट्रवादाला खतपाणी घालणं आणि द्वेष पसरवण्याचं काम असल्याचा आरोप चीनने केला आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमाणाचा धोका लपवल्याचा आरोप चीनवर वारंवार करण्यात येत आहे.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार जर्मनीत कोरोना व्हायरसचे १,४१,६७२ रुग्ण आहेत. जर्मनीत आतापर्यंत ४,४०४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जर्मनीप्रमाणेच अमेरिकेनेही कोरोना व्हायरसवरुन चीनवर वारंवार टीका केली आहे. शनिवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर निशाणा साधला होता. चीनने जाणूनबुजून हे काम केलं असेल, तर याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. 'कोरोनाचं संक्रमण सुरू झालं, तेव्हाच चीनमध्ये ते रोखता आलं असतं. आता संपूर्ण जग कोरोनाच्या संकटात सापडलं आहे,' असं ट्रम्प म्हणाले.