मुंबई : जगभरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातलेलं असताना असेही काही भाग आहेत जिकडे कोरोना व्हायरस अजून पोहोचलेला नाही. जगाच्या कानाकोपऱ्यात कोरोना व्हायरसचे लाखो रुग्ण आहेत, तर हजारो जणांना कोरोना व्हायरसमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. पण जगामध्ये असेही देश आहेत जिकडे कोरोना पोहोचू शकला नाही. तुर्कमेनिस्तान, तजकिस्तान, दक्षिण सुदान, येमेन, उत्तर कोरिया, म्यानमार, कोमोरोस, मालवाई, लेसोथो, बोट्सवाना, बुरुंडी, सियारा लिओनी, साओ टोम ऍण्ड प्रिन्सिपी या १३ देशांना कोरोनाची लागण झालेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पलाऊ, समोआ, तुर्कमेनिस्तानमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही. या भागात कोरोनाचं प्रकरण समोर आलं नसलं तरी नागरिकांमध्ये मात्र घबराट आणि गोंधळाचं वातावरण आहे. पलाऊ, समोआ आणि तुर्कमेनिस्तानमधले नागिरक मोठ्या प्रमाणावर सामानाची साठवणूक करत आहेत. इथली सरकारंही कोरोनाला रोखण्यासाठी विशेष काळजी घेत आहेत. 


पलाऊ हा देश पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेला आहे. पलाऊ या देशात जवळपास ३४० बेटं आहेत. समुआ हा देश पॅसिफिक महासागरामध्ये न्यूझीलंड आणि हवाई या देशांच्या मध्यावर आहे.


अंटार्कटिका हा जगातला एकमेव खंड आहे, जिकडे अजून कोरोना पोहोचलेला नाही. अंटार्कटिकामध्ये अनेक देशांचे रिसर्च स्टेशनमध्ये वैज्ञानिक एकत्र बसून जेवण करत आहेत. या भागामध्ये अजून सोशल डिस्टन्सिंग हा प्रकार सुरू झालेला नाही. नोव्हेंबरपर्यंत या भागात कोणालाही यायला मनाई करण्यात आली आहे.


दुसरीकडे उत्तर कोरियानेही आपल्या देशात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसल्याचा दावा केला आहे. पण या देशावर माहितीची लपवाछपवी केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. उत्तर कोरिया आणि त्यांचा प्रमुख किम जोंग आपल्या हुकुमशाही प्रवृत्तीमुळे जगात बदनाम आहे. उत्तर कोरिया जाणूनबुजून कोरोनाचं प्रकरण लपवत असल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे.