वॉशिंग्टन : अमेरिकेत कोरोनाचा कहर माजला आहे. प्रत्येक दिवशी कोरोना रुग्णांचा धक्कादायक आकडा समोर येतोय. कोरोनामुळे अमेरिकेत मृतांची संख्या 56,500वर पोहचली आहे. गेल्या 24 तासांत अमेरिकेत 2207 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून मृत्यांचा आकडा काहीसा कमी होत असताना पुन्हा एकदा या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेत आतापर्यंत 10 लाखांहून अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या संपूर्ण जगात सर्वाधिक आहे. अमेरिकेत 10 लाख 12 हजार 399 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. 


अमेरिकेत आतापर्यंत 58 लाखहून अधिक लोकांची कोरोना चाचणी झाली आहे. 


रविवार आणि सोमवारी अमेरिकेत मृतांच्या आकडा काहीसा कमी होत 1000 ते 1200च्या आसपास आला होता. त्यामुळे मृतांची संख्या घटत असल्याचं वाटत असताना पुन्हा मोठ्या संख्येने त्यात वाढ झाली.


अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर कोरोनाचं केंद्रबिंदू ठरलं आहे. अमेरिकेतील 30 टक्के कोरोना रुग्ण एकट्या न्यूयॉर्क शहरांत आहेत. तर न्यू जर्सी, मॅसेच्युसेट्स Massachusetts, कॅलिफोर्निया California आणि पेनसिल्व्हानिया Pennsylvania मध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत.


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनामुळे मृतांचा आकडा 70 हजारांपर्यंत पोहचू शकत असल्याचा उल्लेख केला होता. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण जगात कोरोना व्हायरसवर कोणतंही औषध, लस उपलब्ध नाही. अनेक देशांमध्ये कोरोनावरील लस तयार करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. परंतु अमेरिकेत ज्याप्रमाणे मृतांचा आकडा वाढत आहे, यावर कोणताही इलाज नसल्याने, मृतांची वाढती संख्या कमी करणं मोठं आव्हान असल्याचं सांगण्यात आलं आहे.


अमेरिकेनंतर सर्वाधिक कोरोना रुग्ण इटली, स्पेन आणि फ्रान्समध्ये आढळले आहेत.


आतापर्यंत संपूर्ण जगभरात 31 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर जगात 2 लाख 17 हजारहून अधिकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.