मुंबई : कोरोना व्हायरसमुळे जगभरात गेल्या २४ तासांत सुमारे अडीच हजार रुग्णांचा बळी गेला असून कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्याही पावणे पाच लाखांच्या घरात पोहचली आहे. अमेरिकेत कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृतांचा आकडा एक हजारावर गेला आहे. कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत २१ हजार २९७ रुग्ण दगावले असून इटलीतील मृतांची संख्या साडे सात हजारांवर पोहचली आहे. त्यानंतर स्पेनमध्ये ३६४५ रुग्णांचा मृत्यू झाला असून चीनमध्ये ३२८७ रुग्ण दगावले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेत कोरोना रुग्णांच्या मृतांची संख्या एक हजारावर पोहचली. तिथे सलग दुसऱ्या दिवशी २०० हून अधिक जणांचा बळी गेला. न्यूयॉर्कमध्ये सर्वाधिक ३६६ जण मृत्युमुखी पडले आहेत. इटलीत सलग सहाव्या दिवशी ६०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत इटलीत ६८३ जणांचा बळी गेला. इटलीमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ७५ हजाराजवळ पोहचली आहे.


स्पेनमध्ये मृतांचा आकडा ३६४५ इतका झालाय.  स्पेनमध्ये सलग तिसऱ्या दिवशी ५०० हून अधिक रुग्णांचा बळी गेला. गेल्या २४ तासांत स्पेनमध्ये ६५६ बळी गेले, तर कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५० हजारांच्या घरात पोहचली आहे. इराणमध्ये मृतांचा अकडा दोन हजारपार झाला आहे. इराणमध्ये आतापर्यंत २०७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


फ्रान्समध्येही मृतांचा आकडा झपाट्यानं वाढत आहे. तिथे १३३१ रुग्णांचा बळी गेलाय. ब्रिटनमध्येही मृतांची संख्या वाढतच आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत ४६५ जणांनी कोरोनामुळे प्राण गमावला आहे. जगभरात २०० हून अधिक देशांत कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. जगभरातल्या ४ लाख ७० हजारांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून चीनबाहेर सुमारे ३ लाख ९० हजार रुग्ण आहेत. आतापर्यंत २४ टक्के रुग्ण बरे झाल्याचं आकडेवारी सांगते.


कोरोनाचा प्रादुर्भाव २०० हून अधिक देश आणि प्रदेशात झाल्यानंतर अनेक देशांनी लॉकडाऊन केलं आहे. युरोपमधील प्रगत देशांतही आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. विशेष म्हणजे कोरोनानं सगळं जग ठप्प झालं असून जगभरातच आणीबाणीची परिस्थिती उद्भवली आहे. त्याचा अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम झाला आहे