Crossbow Killings Attack Killed 3: ब्रिटनची राजधानी असलेलं लंडन शहर मंगळवारी सायंकाळी एका विचित्र घटनेमुळे हादरुन गेलं. जागतिक नकाशावरील महत्त्वाच्या शहरांपैकी एक असलेल्या लंडनमध्ये चक्क बाण (तीर) मारुन तीन महिलांची हत्या करण्यात आली. धनुष्यबाणातून मारलेले हे तीर बीबीसीचा पत्रकार जॉन हंटच्या पत्नी आणि दोन मुलींना लागले. या तिघींचाही या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. पोलिसांनी सदर प्रकरणामध्ये संक्षयित आरोपीला अटक केली आहे.


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉन हंट यांची पत्नी कॅरोल हंट यांच्यासहीत त्यांच्या दोन्ही मुलींचा मृत्यू झाला आहे. हल्ला करणाऱ्या संक्षयिताचं नाव काइल क्लिफर्ड असं असून तो 26 वर्षांचा आहे. सदर हल्ला हा हर्डफोर्डशायरच्या बुशे भागातील हंट कुटुंबाच्या राहत्या घरी झाला. तिघीहीजण घरी असताना घराबाहेरुन मारलेल्या बाणांनी या तिघींना लक्ष्य करण्यात आलं. या हल्ल्यात तिघीही गंभीर जखमी झाल्या. नंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मरण पावलेल्या कॅरोल या 61 वर्षांच्या होत्या तर त्यांच्या मुली 25 आणि 28 वर्षांच्या होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा सारा प्रकार टार्गेट किलिंगचा म्हणजेच पाळत ठेऊन हत्या करण्याचा आहे. या हत्याकांडासाठी क्रॉस-बो या आधुनिक पद्धतीचा धनुष्यबाण वापरण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. 


तिघीही रक्ताच्या थारोळ्यात पडून होत्या


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने नेमकं या तिघींना का मारलं याची चौकशी सध्या सुरु आहे. मात्र घराच्याबाहेरुन थेट या तिघींवर एकएक करुन तीर मारण्यात आले. तसेच या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या तिघी बराचवेळ रक्ताच्या थारोळ्यात पडून होत्या. जॉन हंट हे बीसीसीसाठी रेसिंगसंदर्भातील वृत्तांकन करतात. पूर्ववैमनस्यातून तर हा हल्ला झाला नाही या याचाही तपास सध्या पोलीस करत आहेत.


देशाच्या गृहमंत्र्यांनी नोंदवली पहिली प्रतिक्रिया


दरम्यान, नुकतीच निवडणूक पार पडलेल्या ब्रिटनमध्ये हा सारा विचित्र प्रकार घडल्यानंतर नवनियुक्त गृहमंत्री यवेट कूपर यांनी सदर प्रकराची माहिती आपण संबंधित अधिकाऱ्यांकडून घेत असल्याचं सांगितलं. 'बुशे भागात काल रात्री 3 महिलांची हत्या झाल्याची घटना फारच धक्कादायक आहे. माझ्या सहवेदना मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबिय, मित्र परिवार आणि समाजाबरोबर आहेत. या प्रकरणावर मी लक्ष ठेऊन असून यासंदर्भातील घडामोडींची माहिती घेत आहे," असं गृहमंत्री म्हणाल्या आहेत.



(जॉन आणि त्यांची पत्नी, फोटो सौजन्य - बीबीसी)


"सदर प्रकरणाबद्दल कोणतीही काहीही माहिती कोणाकडे असेल तर त्यांनी कृपया हर्डफोर्डशायर पोलिसांशी संपर्क साधावा असं मी आवाहन करते,' असं कूपर यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन म्हटलं आहे.