नवी दिल्ली : इस्रायल भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम याद वाशेम या स्थळाला भेट दिली. याद वाशेम हे इस्रायलचं ऐतिहासिक स्मारक आहे. दुस-या महायुद्धात नाझींनी हत्याकांड केलेल्या असंख्य ज्यूंना हे स्मारक समर्पित करण्यात आलं आहे. त्याआधी नरेंद्र मोदी यांचं आकर्षक फुलांचा गुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. रंगीबेरंगी अशी ही अत्यंत मोहक फुलं सर्वांचंच लक्ष वेधून घेणारी अशी होती. मोदींना ही फुलं भेट दिल्यानंतर, इस्रायलमध्ये या फुलांचं नामकरण मोदी असं करण्यात आलं आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं इस्रायलमध्ये अभूतपूर्व स्वागत झालं. तेल अवीवमधल्या बेन गुरीअन विमानतळावर, स्वतः इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नितन्याहू आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह उपस्थित होते. नरेंद्र मोदींप्रमाणेच याआधी अमेरिकेचे अध्यक्ष आणि पोप यांचंच अशा प्रकारे इस्रायलमध्ये भव्य रेड कार्पेट स्वागत करण्यात आलं होतं. नरेंद्र मोदी विमानातून उतरल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी नितन्याहू पुढे आले.