Daredevil Fall Form Skyscraper Dies: नुसते व्हिडीओ पाहूनही अंगावर काटा येईल अशी स्टंटबाजी करणाऱ्या रेमी ल्यूसिडी या 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. फ्रेंच नागरिक असलेल्या रेमीला फ्रेंच डेअरडेव्हिल नावाने ओळखलं जायचं. रेमी हा जगभरामध्ये त्याच्या स्टंटबाजीसाठी प्रसिद्ध होता. मात्र याच स्टंटबाजीच्या नादात हाँगकाँगमधील एका इमारतीच्या 68 व्या मजल्यावरुन पडून रेमीचा मृत्यू झाला आहे.


...अन् तो खाली पडला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार, रेमी ट्रेगुंटर टॉवरवर चढाई करत असताना झालेल्या अपघातामध्ये रेमी या इमारतीवरुन खाली पडला. एवढ्या उंचावरुन पडल्याने रेमीचा जागीच मृत्यू झाला. चढाईदरम्यान वरील मजल्यावर असलेल्या पेंटहाऊसमुळे रेमी चढाई करताना मध्येच अडकला. त्याने इमारतीच्या बाहेरच्या बाजूने चढाई करताना एका घराच्या खिडकीवर मदतीसाठी थाप मारली. एवढ्या उंचावर असलेल्या घराच्या खिडकीवर कोण थाप मारतंय असा विचार करुन घरात काम करणारी मोलकरणी डचकली. ही मोलकरीण या व्यक्तीला मदत करणार इतक्यात रेमीचा पाय सरकला आणि तो इतक्या उंचावरुन खाली पडला. पोलिसांना घटनास्थळी रेमीचा कॅमेरा सापडला असून त्यामध्ये इमारतीवर चढाई करतानाही अनेक छोटे व्हिडीओ आढळून आले आहेत. मात्र पोलिसांनी रेमीचा मृत्यू कशामुळे झाला याबद्दलची अधिकृत घोषणा अथवा खुलासा केलेला नाही.


वॉचमनने अडवण्याचा प्रयत्न केला पण...


हाँगकाँगमधील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार रेमीचा तोल गेल्याने जमीनीवर पडूनच त्याचा मृत्यू झाला. हाँगकाँगमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेमी सायंकाळी 6 वाजता इमारत पाहण्यासाठी गेले होता. त्याने प्रवेशद्वारावरील वॉचमनला आपल्याला 40 व्या मजल्यावर असलेल्या मित्राकडे जायचं आहे असं सांगितलं. मात्र हा मित्र कोण आहे हे रेमीने त्या वॉचमनला सांगितलं नाही. तो या वॉचमनशी बोलताना बोलता लिफ्टमध्ये चढला असं सांगण्यात आलं आहे.


सीसीटीव्हीमध्ये दिसला


सीसीटीव्ही फुटेजमध्ये रेमी 49 व्या मजल्यावर गेला होता असं दिसत आहे. त्यानंतर तो शिड्यांनी वर जाताना दिसत आहे. तपासामध्ये इमारतीच्या गच्चीवर जाणारी खिडकीही उघडलेली असल्याचं दिसून आलं. नंतर रेमी बराच वेळ लोकांना दिसला नाही. मात्र 7 वाजून 38 मिनिटांनी तो इमारतीच्या खिडकीवर थाप मारताना दिसून आला. हे पाहून घाबरलेल्या या मोलकरणीने पोलिसांना फोन केला. मात्र मदत मागण्याच्या प्रयत्नात रेमीचा पाय घसरला आणि तो इमारतीवरुन खाली पडला. त्याच्या मृत्यूमुळे साहसी खेळ प्रेमींनी खेद व्यक्त केला आहे.