भारत आणि सऊदी अरबमध्ये होणार मोठा करार
पंतप्रधान मोदींच्या विमानाला पाकिस्तानने हद्द नाकारली. पण हा करार पाकला धक्का देणार
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधून मोदी सरकारने ५ ऑगस्टला अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला होता. इस्लामसोबत जोडून या मुद्द्यावर पाकिस्तानने इतर देशांकडून समर्थन मागितलं होतं. पण मुस्लीम देशांनी देखील पाकिस्तानला समर्थन दिलं नाही. उलट त्यांनी हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचं म्हटलं होतं.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या मुद्द्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. सऊदी अरबकडून पाकिस्तानला अपेक्षा होत्या. पण त्यांनी देखील पाकिस्तानला मोठा झटका दिला होता.
पंतप्रधान मोदी सोमवारी रात्री सऊदी अरबच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सौदीला जाण्यासाठी पाकिस्नानं हवाई हद्द वापरण्यास इन्कार केलाय. भारताकडून पाकिस्तानची हवाई हद्द वापरू देण्याबाबत परवानगी मागण्यात आली होती. मात्र पाकिस्ताननं त्याला मनाई केली. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी याबाबत माहिती दिली. आता भारत इंटरनॅशनल सिव्हिल एव्हीएशन ऑर्गनायझेशनमध्ये पाकिस्तानविरोधात दाद मागणार आहे.
पाकिस्तानने जर तशी परवानगी नाही दिली तर मोदींचा प्रवास थोडा वाढणार आहे. पण इम्रान खान हे विसरत आहेत की, त्यांनी मार्ग जरी दिला नसला तरी भारत आणि सऊदी अरबमध्ये मोठा करार होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सऊदी अरबमधील रियाद शहरामध्ये आयोजित तिसऱ्या फ्यूचर इनवेस्टमेंट इनिशिएटिव (FII) मध्ये सहभागी होणार आहेत. २९ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान ही परिषद चालणार आहे.
या दौऱ्यात पंतप्रधान मोदी अनेक मोठ्या उद्योगपतींनी भेटतील. त्यांच्यासोबत ते काश्मीरमध्ये व्यवसाय वाढण्यासाठी नक्कीच चर्चा करतील अशी शक्यता आहे. पंतप्रधान मोदी या दौऱ्यात ऊर्जा, संरक्षण, नागरिक विमान सारख्या मुद्द्यांवर करार करतील. दोन्ही देशांमध्ये १२ वेगवेगळे करार होणार आहेत.
याआधी २०१६ मध्ये पंतप्रधान मोदी जेव्हा रियादला आले होते तेव्हा त्यांना सऊदी अरबच्या सर्वोच्च नागरिक सन्मानाने गौरवण्यात आलं होतं. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याआधी पंतप्रधानांचे सल्लागार अजित डोवाल हे देखील रियादला आले होते. पंतप्रधान मोदींच्या यानंतर तुर्कस्थानचा दौऱा होता. पण पाकिस्तानला काश्मीर मुद्द्यावर समर्थन केल्यामुळे पंतप्रधान मोदींनी हा दौरा रद्द केला.