Dhol Tasha Video : महाराष्ट्र आणि त्यातही पुण्यातील गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुका म्हटलं की, ढोल ताशा पथकांचा कल्ला आलाच. मुळात पुण्यातूनच ढोल-ताशा खऱ्या अर्थानं सर्वत्र पसरला आणि त्याला अमाप प्रेम मिळालं. इतकं की, आता परदेशांमध्येही वास्तव्यास असणारे भारतीय आणि त्यातूनही महाराष्ट्रातील मंडळी तिथंही आपल्या या संस्कृतीची झलक दाखवताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच कॅनडामधील ढोल-ताशा पथकांची झलक आपण सर्वांनी पाहिली. त्यामागोमागच आता का युरोपीय राष्ट्रातील पथकाची दृश्य लक्ष वेधत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे पथक आहे उत्तर युरोपीय देश स्वीडनमधील. जिथं पहिल्यांदा ढोल-ताशा पथकाची सुरुवात झाली. स्वीडनमधील गणेश मंदिरातील पहिल्याच सादरीकरणाला अत्यंत उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. स्टॉकहोममधील ढोल-ताशा पथकाचे संस्थापक अभिनय सरकटे आहेत आणि गोथेनबर्गमध्ये प्रणाली मानकर यांनी यासाठी प्रयत्न करत एकत्रितपणे ‘स्वराज्य ढोल-ताशा पथक’ स्थापन केलं. 


गणेश विसर्जनाच्या उत्सवानिमित्त य पथकानं सलग 2 तास धमाकेदार वादन सादर केलं. तिथं उपस्थित भारतीय नागरिक, गणेशभक्त आणि स्थानिक नागरिकांनीही या वादनाला जोरदार प्रतिसाद दिला. शिवाय बाप्पा मोरयाच्या गजरात, ढोल-ताशाच्या तालावर ठेकाही धरला. हे वादन खास होतं, कारण यावेळी महाराष्ट्राच्या संस्कृतीसोबतच स्वीडनलाही तितकाच मान देण्यात आला होता. इथं स्वीडिश ध्वजाच्या निळ्या आणि पिवळ्या रंगांची छटा असलेल्या पथकाच्या खास पेहरावाने स्वीडिश भूमीवर आपल्या भारतीय परंपरेचा सुंदर अनुभव दिला. 



हेसुद्धा वाचा : अंतराळातील Dark Energy आणि अदृष्य वस्तुंचा शोध घेणार; यूरोपियन स्पेस एजेंसीची सर्वात मोठी मोहिम



'आमच्या पथकाचा प्रवास आता कुठे सुरू झाला आहे. सातासमुद्रापार आम्ही आमच्या सांस्कृतिक समृद्धीचा प्रसार करण्यासाठी प्रतिबद्ध आहोत', असा विश्वास स्वराज्य ढोल ताशा पथक आणि पथकाशी संलग्न प्रत्येकानंच व्यक्त केला. परराष्ट्रात असताना आपल्या देशाशी असणारं नातं कलात्मक पद्धतीनं जपणं किती कमाल आहे ना.... !