नवी दिल्ली : भारताला अनेक गुन्ह्यांमध्ये हवा असलेला डी कंपनीचा सदस्य आणि छोटा शकीलचा जवळचा सहकारी मोहम्मद सलीम ऊर्फ मुन्ना झिंग्राला भारतात आणण्याचा मार्ग सुकर झाला आहे. कारण, थायलंडच्या कोर्टाने झिंग्राच्या प्रत्यार्पणाला हिरवा कंदील दिला आहे. सबळ पुराव्याअंती झिंग्रा हा पाकिस्तानचा नागरिक असल्याचा पाकचा दावा फेटाळत तो भारताचाच नागरिक असल्याचे सांगत कोर्टाने त्याला भारताकडे प्रत्यापर्णाचा निर्णय दिला आहे.


छोटा राजनला मारण्याचा कट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झिंग्रा बनावट पासपोर्ट घेऊन बँकॉकमध्ये दाखल झाला होता. छोटा राजनला मारण्याच्या कटातही झिंग्रा सहभागी होता. झिंग्रा हा १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात मुंबई पोलिसांना हवाय. याला पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयकडून संरक्षण मिळालं होतं. पाकिस्तानी दूतावासच्या दबावामुळे शाही माफी मिळून झिंग्राची शिक्षा ३४ वर्षांपर्यंत कमी झाली होती... २०१६ मध्ये थायलंडनं दिलेल्या माफीनंतर झिंग्राची शिक्षा १८ वर्ष करण्यात आली. 


पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून झिंग्रा हा पाकिस्तानी नागरिक असल्याचा दावा केला जात होता. त्याचवेळी भारतीय अधिकाऱ्यांनीही झिंग्रावर दावा केला होता. त्यामुळे या प्रकरणावर थायलंडच्या क्रिमिनल कोर्टात सुनावणी सुरू होती. भारतानं दिलेले पुरावे मान्य करत बुधवारी थायलंड कोर्टानं भारताच्या बाजुनं हा निकाल दिलाय.