नवी दिल्ली : काश्मीरप्रश्नी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची बडबड सुरूच आहे. 'भारत पाकिस्तान या प्रश्नी नक्कीच तोडगा काढतील, पण मध्यस्थी करायला आपल्याला आवडेल' असं ट्रम्प यांनी म्हटलंय. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांना भारताच्या परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी काश्मीरबाबत भारताची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट शब्दात समजावून दिलीय. काश्मीरबाबत काही चर्चा करायचीच झाली तर थेट पाकिस्तानशी करू, असं पॉम्पिओ यांना बजावण्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काश्मीर मुद्यावर जर काही चर्चा झाली तर ती द्विपक्षीय असेल आणि केवळ पाकिस्तानसोबतच होईल, असं भारतानं पुन्हा एकदा ठणकावून सांगत भारतानं कोणत्याही प्रकारच्या हस्तक्षेपाला नाकारलंय. 


बँकॉकमध्ये आयोजित दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या संमेलनात आज भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांची भेट झाली. या भेटीदरम्यान, जयशंकर यांनी पॉम्पिओ यांना पुन्हा एकदा भारताची भूमिका समजावून दिलीय. 

'मध्यस्थतेचा प्रस्ताव स्वीकार करणं किंवा न करणं आता संपूर्णत: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयावर अवलंबून आहे. पंतप्रधान मोदी आणि इमरान खान दोन्ही खूप चांगले व्यक्ती आहेत आणि दोघांनीही आपल्याशी काश्मीर मुद्यावर दिलखुलास बातचीत केली. मी पंतप्रधान इमरान खान यांनाही भेटलो. मला वाटतं पंतप्रधान मोदी आणि इमरान खान दोघंही चांगले व्यक्ती आहेत. माझ्या म्हणण्याचा अर्थ की मला वाटतं ते दोघं चांगल्या पद्धतीनं एकमेकांसोबत येऊ शकतात. पंतप्रधान मोदींना असं वाटलं की काश्मीर मुद्यावर कुणी मध्यस्थता करावी तर मी या संदर्भात पाकिस्तानशी बातचीत केलीय आणि मी याच संदर्भात भारताशीही संवाद साधलाय. दीर्घकाळापासून हा वाद सुरू आहे' असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान दरम्यानच्या काश्मीर प्रश्नात पुन्हा एकदा नाक खुपसण्याचा प्रयत्न केलाय.