कुत्र्यामुळे झालं कॅन्सरचं निदान
पाळीव प्राण्याने बचावला जीव
इंग्लंड : कॅन्सर हा धोकादायक आजार आहे. याचं योग्यवेळी निदान होणं गरजेचं असतं. जेणेकरून वेळेवर उपचार सुरू करता येतात. इंग्लंडमधील एका महिलेला तिच्या पाळीव श्वानांमुळे कॅन्सरचं निदान झालं. वेळीच उपचार करता आल्याने या महिलेने आपल्या जर्मन शेफर्ड कुत्र्याचे आभार मानले आहेत.
युकेच्या वेल्स शहरातील ही घटना 65 वर्षीय महिला लिंडा मुंकलेच्या (Linda Munkley)यांच्यासोबत घडली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून यांच्या घरातील दोन जर्मन शेफर्ड थोडे विचित्र वागत असल्याचं लक्षात आलं.
तर झालं असं, महिलेकडे चार जर्मन शेफर्ड आहेत. त्यातील दोन कुत्रे वेगळं वागत असल्याचं लक्षात आलं. 'एक दिवस मी सोफ्यावर बसले होते. तेव्हा एक कुत्रा जवळ आला. माझ्या शरिराचा वास घेऊ लागला. आणि त्याने माझ्या छातीवर डोकं आपटायला सुरूवात केली. याआधी तो असं कधीच वागला नव्हता, असं लिंडा सांगते.
'एक दोन वेळा नाही तर तब्बल महिनाभर तो कुत्रा तसंच करत होता. असं कधीच न करणारा कुत्रा असं का करतो? म्हणून मी तपासणी करायचं ठरवंल तेव्हा मला कॅन्सर झाल्याचं निदान झालं, असं लिंडा सांगते.
कुत्रा महिलेला जे सांगण्याचा प्रयत्न करत होता. ते उपचारादरम्यान समोर आलं. स्तनामध्ये गाठ असून ती गाठ कॅन्सरकडे इशारा देत असल्याचं डॉक्टर म्हणाल्या. अधिक उपचार करून कळलं की, लिंडाच्या स्तनामध्ये एक छोटीशी गाठ असून ती वेगाने वाढत आहे. गाठ संपूर्ण स्तनात पसरत होती. त्यावेळी डॉक्टरांनी तात्काळ लिंडावर उपचार केले.
उपचारा दरम्यान अशी बाब समोर आली की, जेव्हा तिच्यावर तिसरी किमोथेरेपी पार पडली तेव्हा तिच्या कुत्र्यांनी दोन महिन्यापासून सुरु असलेलं कृत्य बंद केलं. लिंडाचे प्राण हे फक्त तिच्या पाळीव प्राण्यांमुळेच वाचल्याच ती सांगते.