Close encounter with asteroid : अवकाश आणि त्याबाबतच्या अनेक गोष्टी सध्या कुतूहलाचा विषय ठरत आहेत. कारण आहे ते म्हणजे या अंतराळाबाबतची आपल्यासमोर आलेली अनेक रहस्य. नासा, इस्रो या आणि अशा जगातील अनेक देशांच्या अंतराळ संशोधन संस्थांनी त्यांच्या परिनं या अनोख्या जगताची गुपितं जनसामान्यांपुढं आणून ठेवली आणि पाहता पाहता या कुतूहलात भर पडत गेली. नासाची यामध्ये कायमच महत्त्वाची भूमिका पाहायला मिळाली आहे. मग त्या विविध मोहिमा असो किंवा एखाद्या संकटाची पूर्वसुचना देणं असो. नासा संशोधन आणि इतर गोष्टींमध्ये बऱ्याचदा आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा या नासानं लघुग्रहांच्या बाबतीतही अनेक निरीक्षणपर मोहिमा राबवल्या. जिथं लघुग्रह, त्यांच्यापासून उदभवणारी संकटं आणि त्या संकटांची तीव्रता यासोबतच भविष्यात लघुग्रहांची स्थिती याबाबतचे संदर्भ समोर आले. इतकंच काय तर, मागील वर्षी नासानं  Double Asteroid Redirection Test (DART) ही एक चाचणीही घेतली जिथं त्यांच्या एका यानानं OSIRIS-REx आणि Hayabusa2 या लघुग्रहांची वाटही यशस्वीरित्या बदलली होती. 


याच नासाकडून आता पृथ्वीजळून जाणाऱ्या एका लघुग्रहाबाबत एक इशारा देण्यात आला आहे. हा लघुग्रह पृथ्वीला कोणताही धोका पोहोचवणार नसला तरीही तो आतापर्यंतच्या सर्वात जवळच्या अंतरावरून जाणार असल्याचं नासानं सूचित केलं आहे. 


लघुग्रहाचं नाव काय माहितीये? 


Asteroid 2023 SE4 असं या लघुग्रहाचं नाव असून, तो सध्या पृथ्वीच्याच दिशेनं येत आहे. 29 सप्टेंबर या दिवशी हा लघुग्रह पृथ्वीपासून फार जवळून पुढं जाणार आहे. विविध यानं आणि कक्षांच्या माध्यमातून नासानं या लघुग्रहाच्या मार्गाबाबतची ही माहिती प्रसिद्ध केली. हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जात असताना तो 2 मिलियन किलोमीटर अंतरावरून साधारण 16662 किमी प्रतितास या वेगानं पुढे जाणार आहे असं नासानं स्पष्ट केलं. 


लघुग्रहाबाबत अधिक माहिती देत नासानं तो पृथ्वीवर आदळणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. शिवाय त्याचं आकारमानही जगासमोर आणलं आहे. नासाच्या माहितीनुसार हा लघुग्रह 45 फूट रुंद असून एखाद्या घराइतका त्याचा आकार मोठा आहे. पृथ्वीच्या जवळून जाणारा हा पहिला लघुग्रह नसून यापूर्वी तो 1965 मध्ये पृथ्वीपासून 4.1 मिलियन किमी इतक्या अंतरावरून गेला होता. आता 2061 मध्ये हाच लघुग्रह पुन्हा एकदा पृथ्वीच्या जवळून जाईल.