श्रीलंकेत आठवा बॉम्बस्फोट, मृतांचा आकडा १६२ वर, संपूर्ण देशात कर्फ्यू
श्रीलंकेची राजधानी कोलंबो साखळी बॉम्बस्फोटाने पुन्हा हादरली आहे.
कोलंबो : श्रीलंकेची राजधानी कोलंबो साखळी बॉम्बस्फोटाने पुन्हा हादरली आहे. सातवा आणि आठवा बॉम्बस्फोट हा काही वेळाच्या अंतरामध्येच झाला आहे. सातव्या बॉम्बस्फोटामध्ये २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आठव्या बॉम्बस्फोटाबद्दल अजून माहिती मिळालेली नाही. या बॉम्बस्फोटात आत्तापर्यंत १६२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यातले ३५ परदेशी नागरिक आहेत. तर ५०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.
या बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. तसंच श्रीलंकेतल्या सोशल नेटवर्किंगही बंद करण्यात आलं आहे. या बॉम्बस्फोटाप्रकरणी एकाला अटक करण्यात आलेली आहे. पण अजूनही कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.
जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना, श्रीलंकेची राजधानी कोलंबो साखळी बॉम्बस्फोटांनी हादरलं आणि अवघ्या श्रीलंकेने पुन्हा मृत्यूचं तांडव पाहिलं. श्रीलंकेत ईस्टर साजरा होत असताना हे स्फोट झालेत. ३ चर्च आणि ३ पंचतारांकीत हॉटेलात हे स्फोट झाले. ईस्टरची प्रार्थना सुरू असताना सकाळी ८.४५ वाजता हे स्फोट झाले. कोलंबो आणि बाट्टीकाओला या दोन शहरात हे स्फोट झाले. सेंट अँथनी चर्च, सेंट सेबेस्टीअन चर्च ही दोन कोलंबोमधली चर्च आणि बाट्टीकोआला भागातलं एक चर्च इथे ३ स्फोट झाले तर शांग्री ला, सिन्नामॉन ग्रँड आणि किंग्जबरी या तीन पंचतारांकीत हॉटेलात ३ स्फोट झाले.
गेल्या दहा वर्षातला श्रीलंकेमधला हा सगळ्यात मोठा हल्ला आहे. एलटीटीई आणि सिंघलीमधील संघर्षाची आठवण करून देणारा हा स्फोट असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं.
काही आठवड्यांपूर्वी न्यूझीलंडमध्ये मशिदीत स्फोट झाले होते. या स्फोटानंतर श्रीलंकेतील हा स्फोट म्हणजे दक्षिण आशियात धार्मिक मूलतत्त्ववाद वाढत असल्याचं तज्ज्ञ सांगतायत. त्यामुळे हा वाढता दहशतवाद दक्षिण आशियातील देशांसाठी चिंतेचा विषय म्हणावा लागेल.