Tesla Share: एलॉन मस्क यांनी पुन्हा टेस्ला कंपनीचे शेअर विकले, कारण...
एलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा टेस्ला कंपनीचे शेअर्स विकल्याने जोरदार चर्चा सुरु झाली.
Elon Musk Sells Tesla Shares: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा टेस्ला कंपनीचे शेअर्स विकल्याने जोरदार चर्चा सुरु झाली. काही महिन्यांपूर्वी ट्विटर विकत घेण्याचा करार चर्चेत होता. आता टेस्लाचे शेअर विकल्याने चर्चा होत आहे. कारण काही दिवसांपूर्वी एलॉन मस्क यांनी सांगितलं होतं की, ते टेस्लाचे शेअर्स विकणार नाहीत. या वर्षी एप्रिलच्या शेवटी, एलॉन मस्क यांनी सोशल मीडियावर सांगितले होतं की, भविष्यात टेस्लाचे शेअर विकण्याचा कोणताच विचार नाही. आता एलॉन मस्क यांनी 6.88 बिलियन डॉलर किमतीचे 79 लाख शेअर्सची विक्री केली आहे. एलॉन मस्क यांनी 5 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट दरम्यान शेअर्सची विक्री केली आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशननुसार ही माहिती समोर आली आहे.
या विक्रीनंतर एलॉन मस्क यांच्याकडे टेस्लाचे 155.04 दशलक्ष शेअर्स शिल्लक आहेत. गेल्या महिन्यात टेस्लाने त्याचे तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीने अपेक्षेपेक्षा चांगली कमाई केल्याने शेअर्सची किंमत सुमारे 15 टक्क्यांनी वाढली आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठीची टॅक्स क्रेडिट मर्यादा काढून टाकण्याच्या अमेरिकन सरकारच्या निर्णयामुळे कंपनीलाही मदत झाली आहे.
दुसरीकडे, एलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा ट्विटर विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे. एलॉन मस्क यांनी पराग अग्रवाल यांना ट्विटरवर खुले आव्हान दिले आहे. पराग अग्रवाल यांना टॅग करत ट्विटरने त्यांच्या 100 खात्यांचे नमुने घेण्याची पद्धत सांगावी आणि तपासण्याची पद्धत फेक आहे की नाही ते सांगावं. असं केल्यास पुन्हा ट्विटर विकत घेईल, असं सांगितलं आहे.
एलॉन मस्क यांनी फेक अकाउंटचा मुद्दा उपस्थित करून 44 अब्ज डॉलरचा ट्विटर करार रद्द केला होता. मस्क यांनी सांगितलं होतं की, जोपर्यंत ट्विटर बनावट खात्यांबद्दल संपूर्ण माहिती देत नाही तोपर्यंत हा करार पूर्ण करणार नाही.