ऍलॉन मस्क मानवी मेंदूत बसवणार कॉम्प्युटर चिप; प्रयोग यशस्वी झाला तर अशक्यही शक्य होईल
या ब्रेन चिपमुळे माणसांचं अपंगत्व दूर होण्यास मदत होईल असा दावा न्यूरा-लिंकने केलाय. विशेष म्हणजे एलन मस्क यांना स्वत: ही चिप आपल्या मेंदूत बसवायची आहे.
Elon Musk Computer Chip : ट्विटरचे सर्वेसर्वा एलॉन मस्क ज्या क्षेत्रात पाऊल टाकतात तिथे काही ना काही तरी हटके करतातच. आता ऍलॉन मस्क मानवी मेंदुत चीप बसवण्याचा प्रयोग करणार आहेत. मेंदूमध्ये कॉम्प्युटर प्रोग्राम फिट केला जाणार आहे. ऍलॉन मस्क यांच्या प्रयोगाला मान्यता मिळाली आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर अशक्यही शक्य होईल.
ऍलॉन मस्क यांचा भन्नाट प्रयोग
इलेक्ट्रिक कार असोत वा हायपरलूप तंत्रज्ञान. मंगळावरील वस्तीसाठी अंतराळ संशोधन असोत वा ट्विटर. ऍलॉन मस्क जे हातात घेतात त्यात काहीतर हटकेपणा करतात. आता मस्क यांनी एक असं प्रोजेक्ट तयार केलंय जे संपूर्ण मानवजातीसाठी वरदान ठरु शकतं.
चीपद्वारे मनुष्याला नवी ताकद मिळणार
ऍलॉन मस्क यांनी एक असं प्रोजेक्ट सुरु केलंय ज्याद्वारे मानवी मेंदुत चीप बसवली जाणार आहे.. या चीपद्वारे मनुष्याला नवी ताकद मिळणार आहे..मस्क यांच्या न्यूरालिंक कंपनीनं 2016 पासूनच मानवी मेंदुत कॉम्प्युटर चीप बसवण्याच्या प्रोजेक्टचं काम सुरु केलं होतं. या प्रोजेक्टअंतर्गत मानवी परीक्षण करण्यासाठी अमेरिकन फूड अँड ड्रग्स ऍडमिनिस्ट्रेशनकडून मंजुरी मिळाली आहे.
काय आहे न्यूरालिंक प्रोजेक्ट
मेंदूत चिप बसवण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यास अनेक मानवी विकारांवर मात करणं शक्य होईल. अर्धांगवायू, मेंदू विकार, अल्झायमर, पाठीच्या कण्याच्या दुखापती दूर करता येतील. शिवाय स्मृतिभ्रंश, नैराश्य, निद्रानाश या विकारांवरही मात करता येईल, अशी माहिती न्यूरालिंकमधल्या सूत्रांनी दिली. हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी विविध क्षेत्रातल्या लोकांनी न्यूरालिंकमध्ये काम करावं, असं आवाहन एलन मस्क यांनी केले आहे.
एलन मस्कच्या स्पेस एक्सचे अंतराळ मिशन
एलन मस्कच्या स्पेस एक्सने दुस-या खासगी अंतराळ मिशनद्वारे चार जणांना आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनला पाठवल आहे. फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस स्टेशनवरून या यानाचं यशस्वी प्रक्षेपण झालंय. याद्वारे पहिल्यांदाच सौदी अरेबियाची एक महिलाही अंतराळ मिशनवर गेलीय. अशी कामगिरी करणारी रायना बर्नावी सौदी अरेबियाची पहिली महिला ठरली आहे.