भारतीय विमानाचं पाकिस्तानात आपत्कालीन लँडिंग, पण नाही वाचवू शकले प्रवाशाचे प्राण
पाकिस्तानच्या कराची शहरात इंडिगो विमानाचे तातडीचे लँडिंग
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या कराची शहरात इंडिगो विमानाचे तातडीचे लँडिंग करण्यात आले. एका प्रवाशाची प्रकृती बिघडल्याने विमानाचे आपत्कालीन लँडिंग झाले. दुर्दैवाने प्रवाशाचा मृत्यू झाला. विमानतळावरील वैद्यकीय पथकाने त्यांना मृत घोषित केले. वृत्तसंस्था एएनआयच्या माहितीनुसार, इंडिगोचे 6E 1412 विमान शारजाहहून लखनऊला येत होते.
इंडिगोने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रवाशाची तब्येत बिघडल्यानंतर हे विमान कराचीच्या दिशेने वळविण्यात आले. येथे पोहोचल्यावर विमानतळ वैद्यकीय पथकाने प्रवाश्याला मृत घोषित केले. एअरलाइन्सने प्रवाशाच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला. या महिन्याच्या सुरुवातीस, भारतीय एअर अॅम्ब्युलन्सने इस्लामाबाद विमानतळावर इंधन भरण्यासाठी आपत्कालीन लँडिंग केले होते.
जिओ न्यूजच्या म्हणण्यानुसार, लखनऊला जाणारे विमान जेव्हा पाकिस्तानजवळून जात होते, तेव्हा एका प्रवाशाची तब्येत ढासळली. यानंतर विमानाच्या कॅप्टनने वाहतूक नियंत्रणाशी संपर्क साधून यासंदर्भात माहिती दिली आणि कराची विमानतळावर आपत्कालीन लँडिंगसाठी परवानगी मागितली. परवानगी मिळताच विमान सकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी कराची येथे उतरले. मिळालेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या धक्क्याने 67 वर्षांच्या प्रवाशाचा विमानात मृत्यू झाला.
मागील वर्षाच्या सुरुवातीला, रियाधहून दिल्लीला जाणारे गो-एअरचे विमान वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे कराची विमानतळाकडे वळवावे लागले होते. परंतु, ज्या प्रवाशाची प्रकृती बिघडली होती. त्या प्रवाशाला वाचवण्यात अपयश आलं होतं.