America Got Talent Girl Died: अमेरिकेतील जगप्रसिद्ध अशा 'अमेरिकाज गॉट टॅलेंट' या रिअॅलिटी शोमध्ये झळकलेल्या 17 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कॅलिफॉर्नियामध्ये राहणाऱ्या 17 वर्षीय एमिली गोल्ड (Emily Gold) नावाच्या चेअरलीडरने स्वत:चं आयुष्य संपवलं असून तिच्या निधनामुळे मनोरंजनसृष्टीमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.


अनेक वाहनांनी चिरडला मृतदेह


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एमिली गोल्डचा मृतदेह शुक्रवारी रात्री एका रस्त्याच्या बाजूला आढळून आला. पोलिसांकडून एमिलीने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. कॅलिफॉर्निया हायवे पेट्रोल या पोलिसांच्या पथकाने एमिलीच्या मृतदेह वाहनांनी चिरडलेल्या अवस्थेत सापडल्याचं सांगितलं आहे. अनेक वाहनांनी चिरडल्यामुळे एमिलीचा मृतदेह पोलिसांना छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला. ही आत्महत्या असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात असली तरी एमिलीच्या मृत्यूसंदर्भातील गूढ कायम आहे. तिच्या मृत्यूसंदर्भातील अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत. तिने आत्महत्या का केली? नेमकी आत्महत्या कशी केली? एवढ्या गाड्यांनी तिला चिरडलं तरी कोणाच्यात कसं लक्षात आलं नाही की आपण एका मृतदेहाला धडक दिली आहे? हे आणि असे अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत.


मिळालेलं स्टॅण्डींग ओव्हेशन


एमिली गोल्ड ही हायस्कूलमधील चेअरलीडर होती. तिचा लॉस ओसोस हायस्कूलचा संघ एनबीसीच्या 'अमेरिकाज गॉट टॅलेंट' या कार्यक्रमात महिन्याभरापूर्वी सहभागी झाला होता. एमिलीच्या संघाचं सर्वच परिक्षकांनी कौतुक केलं होतं. मे महिन्यामध्ये 'अमेरिकाज गॉट टॅलेंट'च्या ऑडिशनदरम्यान एमिली गोल्ड आणि तिच्या संघाला परिक्षकांबरोबरच प्रेक्षकांकडून स्टॅण्डींग ओव्हेशन मिळालं होतं. या कार्यक्रमाच्या उपांत्य फेरीमध्ये एमिलीच्या संघाने प्रवेश केला होता. मात्र 14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या भागामध्ये एमिलीचा संघ या कार्यक्रमाच्या जेतेपदाच्या शर्यतीमधून बाहेर पडला. 


भावाची भावूक पोस्ट


एमिली गोल्डचा भाऊ, अ‍ॅलेक्सने आपल्या इन्स्टाग्रामवरुन बहिणीच्या मृत्यूचा संदेश शेअर केला आहे. "आम्ही एकत्र घालवलेला वेळ कधीच पुरेसा वाटणार नाही. तुझ्याबरोबरच मी माझं अर्ध हृदय गमावलं आहे. तुला स्वर्गात जागा मिळो एमिली गोल्ड. कारण तुझ्यासारख्या व्यक्तीचं जग हे स्वर्गच आहे," असं तिच्या भावाने तिच्या निधनाची पोस्ट शेअऱ करताना म्हटलं आहे. 


ती फारच प्रेमळ होती


एमिली गोल्ड लॉस ओसोस हायस्कूलमध्ये वरिष्ठ वर्गात शिकत होती. ती तिच्या शाळेच्या संघाची डान्स कॅप्टन होती. एमिलीच्या निधनानंतर तिच्या मैत्रिणींना धक्का बसला असून डान्सच्या टीमने इन्स्टाग्रामवरुन शोक व्यक्त केला आहे. ती फारच प्रेमळ, दयाळू आणि प्रेम करणारी होती, असं या टीमने म्हटलं आहे. सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा एमिलीचा स्वभाव होता असंही टीमने म्हटलं आहे.



अर्थसहाय्य करण्याचं आवाहन


एमिली गोल्डच्या निधनानंतर कुटुंबाला आर्थिक सहाय्य करण्यासाठी ऑनलाइन फंड रेझर इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे. गो फंड मीच्या माध्यमातून सुरु केलेल्या या इव्हेंटअंतर्गत एमिलीच्या कुटुंबाला देण्यासाठी 50 हजार डॉलर्स गोळा करण्याचं उद्दीष्ट समोर ठेवण्यात आलं आहे. या पैशांमधून एमिलीवर अत्यंसंस्कार करण्याबरोबरच तिच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली जाणार आहे.