उत्तर प्रदेशातील 3 इंजिनिअर तरुणांनी म्यानमारमध्ये ओलीस ठेवण्यात आल्याचं समोर आलं आहे. चीनमधील एक कंपनी आपल्याकडून जबरदस्ती सायबर गुन्हे करण्यास भाग पाडत असल्याचा तरुणांचा आरोप आहे. जर विरोध केला तर मारहाण आणि इलेक्ट्रिक शॉक देऊन आपल्यावर अत्याचार केला जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. बाराबंकी येथील रहिवासी असणाऱ्या या तरुणांनी म्यानमारमधून व्हिडीओ जारी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून आपली सुटका करावी अशी मदत मागितली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊ आणि बाराबंकी येथील हे तिघेजण इंजिनिअर असून मित्र आहेत. ते मानवी तस्करीच्या जाळ्यात अडकले आहेत. बाराबंकी जिल्ह्यातील जैदपूर ठाणे क्षेत्रातील रहिवासी अमरनाथ यांनी नोकरीसाठी परदेशात गेलेल्या मुलाला ओलीस ठेवल्याचा आरोप केला आहे. आपला मुलगा अजय कुमार मित्रांसह नोकरीच्या उद्देशाने 26 मार्च 2024 रोजी मलेशियात पोहोचला होता. पण तिथे गेल्यानंतर त्यांना म्यानमारला पाठवण्यात आलं. 


इंजिनिअर असणाऱ्या राहुलने व्हिडीओ जारी करत सांगितलं आहे की, चीनची कंपनी स्किमिंग करत आहे. राहुल 26 मार्च 2024 रोजी आपला मित्र सागरसर नोकरीच्या उद्देशाने मलेशियासाठी निघाला होता. त्यांना लखनऊमधून हैदराबाद आणि तेथून बँकॉकमधील हॉटेलमध्ये नेण्यात आलं. यानंतर टॅक्सीने त्यांना म्यानमारला पोहोचवण्यात आलं. 


आपल्याला भारत आणि म्यानमार दुतावासाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचं तरुणांचं म्हणणं आहे. इंजिनिअर्सच्या कुटुंबाकडून 8 लाख 14 हजारांची खंडणी वसूल करण्यात आल्याचाही आरोप आहे. ओलीस ठेवण्यात आलेल्या तरुणांचं म्हणणं आहे की, बंदुकीचा धाक दाखवत आम्हाला 18 ते 20 तास सायबर गुन्हेगारीशी संबंधित काम करायला लावलं जात आहे. आम्ही नकार दिला असता मारहाण केली जात असून, इलेक्ट्रिक शॉकही दिले जात आहेत. यानंतर अजय कुमारने व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदत मागितली आहे.