दर 11 व्या मिनिटाला जोडीदारच घेतोय जीव; महिलांच्या जगण्यातील दाहक वास्तवावर UN चा कटाक्ष
Violence against Women : संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी महिलांवरील हिंसाचार हे जगातील मानवी हक्कांचे सर्वात मोठे उल्लंघन आहे, असे म्हटलं आहे
Violence against Women : दिल्लीच्या (Delhi) मेहरौलीमध्ये महाराष्ट्रातील श्रद्धा वालकर (sharda walker case) हिच्या लिव्ह-इन पार्टनरने केलेल्या भीषण हत्येमुळे सध्या संपूर्ण देश हादरलाय. आफताब पूनावालाने (aftab poonawalla) श्रद्धा वालकरची हत्या करत तिच्या मृतदेहाचे तुकडे विविध ठिकाणी फेकले. हत्येच्या तब्बल नऊ महिन्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केलाय. आपल्याच जोडीदारासोबत अशा प्रकारचे कृत्य करण्याचे धाडस कसे होते असा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. श्रद्धाच्या हत्येनंतर महिलांवरील अत्याचाराचा (Violence against Women) प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जगभरातही अशाच प्रकारची मानसिकता असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांनी (UN) दिली आहे. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस (Antonio Guterres) यांनी याबाबत भाष्य केले आहे. महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी दरवर्षी 25 नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो. या दिवसाआधीच महिलांबाबत होत असलेल्या हिंसाचाराबाबत अँटोनियो गुटेरेस यांनी धक्कादायक दावा केला आहे.
दर 11 मिनिटांनी एका महिलेची तिचा पती/ प्रियकर किंवा कुटुंबीयांकडून हत्या केली जाते अशी माहिती संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटारेस यांनी ही दिली आहे. महिला आणि मुलींवरील हिंसाचार हे जगातील सर्वात मोठे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे, असे गुटेरेस यांनी म्हटले आहे. गुटेरेस यांनी जगभरातील राज्यकर्त्यांना 2026 पर्यंत महिला हक्क संघटना आणि चळवळींसाठीचा निधी 50 टक्क्यांनी वाढवण्याचे आवाहन केले आहे.
कोविडनंतर हिंसाचारात वाढ
कोरोना महामारीमुळे बिघडलेली आर्थिक परिस्थिती आणि इतर तणावामुळे शारीरिक आणि शाब्दिक हिंसाचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. महिला आणि मुलींवरील ऑनलाइन हिंसाचाराचाबाबतही गुटेरेस यांनी भाष्य केले. द्वेषयुक्त भाषण, लैंगिक छळ आणि महिलांविरुद्ध फोटोंचा गैरवापर यासारख्या ऑनलाइन तक्रारी समोर येत आहेत, असे गुटेरेस म्हणाले.