दुबईतील बुर्ज खलिफावर झळकला रामाचा फोटो? काय आहे सत्य
सोशल मीडियावर अनेकांनी फोटो शेअर केल्यानंतर लगेच त्यावर कमेंट्सचा पाऊस पडू लागला. यामधील काहींनी हा फोटो खरा आहे का अशी शंकाही व्यक्त केली.
भारताच्या इतिहासात 22 जानेवारी 2024 हा दिवस आता सुवर्णक्षरांनी लिहिण्यात आला आहे. सोमवारी म्हणजेच 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अयोध्येत एकच गर्दी उसळली होती. उद्योग, मनोरंजनापासून सर्व क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्यासाठी हजर होते. अनेकांनी टीव्हीवह हा सोहळा लाईव्ह पाहिला. तसंच देशभरात लोकांनी रस्त्यांवर शोभायात्रा काढत आपला आनंद साजरा केला. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
यादरम्यान दुबईतील बुर्ज खलिफा इमारतीवर प्रभू श्रीरामाचा फोटो झळकल्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हा फोटो व्हायरल झाला असून, 20 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. यावरुन चर्चाही रंगली आहे.
या फोटोत बुर्ज खलिफा रोषणाईने उजळलेलं दिसत आहे. तसंच वरती 'जय श्रीराम' लिहिलेलं दिसत आहेत. हा फोटो शेअर करणाऱ्यांनी तो खरा असल्याचा दावा केल्यानंतर त्यावर कमेंट्सचा पाऊस पडू लागला. यातील काहींनी हा फोटो खरा असल्याचा दावाही केला. दरम्यान एका युजरने फोटो खरा आहे की नाही माहिती नाही, पण त्याचं वेड फार आहे असं लिहिलं आहे.
एका युजरने लिहिलं आहे की, "हा फोटोशॉप नाही आहे. हा डिजिटली एडिट केला आहे. जय श्रीराम, संपूर्ण जगाला रंगवा". पण गुगलवर रिव्हर्स इमेज सर्च केलं असता बुर्ज खलिफा याच रोषणाईत दिसत आहे. पण यामध्ये त्यावर रामाचा फोटो नाही.
जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर जेव्हा एखाद्या मोठ्या प्रसंगी रोषणाई करत तो क्षण साजरा केला जातो तेव्हा त्याच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर केल्या जातात. पण अशी कोणतीही पोस्ट त्याच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केलेली नाही. एप्रिल 2023 मध्येही असाच प्रकार घडला होता. पण त्यावेळी तो बनावट असल्याचं सिद्ध झालं होतं.
दरम्यान राम मंदिराचे दरवाजे मंगळवारी सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहेत. यावेळी रामलल्लाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी उसळली होती. पोलिसांनाही ही गर्दी नियंत्रित होत नव्हती. अंग गोठवणाऱ्या थंडीत लाखो भक्त रांगेत उभे राहून दरवाजा उघडण्याची प्रतिक्षा करत होते.