नवी दिल्ली : आधी दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करा, मगच बोलू, अशी भारताने रोखठोक भूमिका पाकिस्तानसंदर्भात घेतली आहे. दरम्यान, भारतीय वैमानिकाची सुटका करुन तणाव निवळणार असेल, तर त्याला सोडायला तयार, अशी माहिती पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने दिली. दरम्यान, पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतीय वैमानिकाची उद्या सुटका करणार असल्याचे जाहीर केले. तर दुसरीकडे पाकिस्तानचा भारतीय हद्दीत पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न दिसून आला. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचा हा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला आहे. तसेच भारत - पाकमधील वाढता तणाव लक्षात घेता अमेरिकेनेही चिंता व्यक्त केली आहे. भारत-पाकिस्तानमधला तणाव लवकरच संपेल, असा विश्वास अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला. तर भारत-पाकिस्तान दरम्यान मध्यस्थीसाठी सौदी अरेबियानेही पुढाकार घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानने दहशतवादाविरोधात तातडीने, कठोर आणि विश्वासार्ह कारवाई करावी, अशी भूमिका भारताने घेतली आहे. इम्रान खान दहशतवादविरोधी कारवाईच्या ज्या वल्गना करतात, जे बोलतात, ते त्यांनी प्रत्यक्ष करुन दाखवावे, असं भारतानं म्हटलंय.  एएनआयच्या सूत्रांनी ही माहिती दिली. भारतीय वैमानिक अभिनंदन यांना परत करणं म्हणजे तणाव निवळणे असे असेल तर आम्ही त्याला सोडायला तयार आहोत असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी म्हटले होते. विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेबाबत आम्ही लवकरच निर्णय घेऊ अशी माहितीही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली. त्यामुळे आता विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेच्या शक्यता बळावल्या होत्या. दरम्यान, पाकिस्तान संसदेत पंतप्रधान इम्रान खान यांनी आम्ही शांततेसाठी भारतीय वैमानिकाला उद्या सोडत आहोत, असे घोषित केले. मात्र पाकिस्तान याआडून कंदाहार प्रमाणे दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा कोणत्याही दबावाला भारत बळी पडणार नाही, पाकिस्तानने तातडीने वैमानिक अभिनंदनला भारतात परत पाठवावे अशी भूमिका भारताने घेतली होती. त्याला पाकिस्तानकडून प्रतिसाद मिळाला आहे. अभिनंदन हे उद्या वाघा बॉर्डरवरुन भारतात परततील. 


पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचा सदस्य आदिल दार याने भारतीय लष्कराच्या ताफ्यावर भ्याड आत्मघातकी हल्ला केला. यात लष्कराचे ४० जवान शहीद झालेत. त्यानंर भारताने १२ व्या दिवशी जैश संघटनेला धडा शिकविण्यासाठी पाकिस्तान हद्दीतील बालाकोट येथे घुसून दहशतवादी संघटनांच्या अड्ड्यांवर बॉम्बहल्ला केला आणि दहशतवाद्यांचा नायनाट केला. त्यानंतर पाकिस्तानच्या २० विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली. त्यावेळी पाकिस्तानचे एफ १६ हे लढावू विमान भारतीय सैन्याने पाडले. दरम्यान, भारतीय विमानांनी पाकिस्तानच्या विमानांना पिटाळून लावताना एक विमान पाकिस्तान हद्दीत घुसले. त्यावेळी अभिनंदन यांनी पॅरॅशुटमधून खाली उडी मारली आणि ते पीओकेत खाली उतरले. त्यानंतर पाकिस्तान सैन्याने त्यांना त्याब्यात घेतले होते.