आता ऑफिसला जा उडत ! लवकरच येणार फ्लाईंग कार
प्रतीक्षा लवकरच संपणार, फ्लाईंग कारचा उडण्याचा मार्ग मोकळा
Flying Car : आजवर आपण फ्लाईंग कारबद्दल अनेकदा ऐकलंय. मात्र सर्वांनाच उस्तुकता आहे ती या फ्लाईंग कारमधून उडण्याची. आता ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कारण फ्लाईंग कारचा उडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
स्लोव्हाकिया (slovakia) हा जगातील पहिला देश आहे जिथं फ्लाईंग कारला (Flying Car) मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात स्लोव्हाकियाच्या आकाशात फ्लाईंग कार्सची गगनभरारी अनुभवायला मिळेल. स्लोव्हाकिया ट्रान्सफोर्ट ऍथोरिटीनं (Slovak Transport Authority) आपल्या देशात या कारच्या उड्डाणाला परवानगी दिली आहे. सध्या सोशल मीडियात याच फ्लाईंग कारचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.
क्लेनव्हिजनल (Klein Vision) या यूट्यूब चॅनलवरून व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एका कारचं एअरक्राफ्टमध्ये (Air Craft) रूपांतर होताना दिसतं. लँडिंगनंतर हेच एअरक्राफ्ट कार बनून जमिनीवर धावताना दिसतंय.
या फ्लाईंग कारची खासियत म्हणजे तिच्या दोन्ही बाजुला विमानाप्रमाणे पंख आहेत. या कारमध्ये BMW चं इंजिन बसवण्यात आलंय. या दोन आसनी कारचं वजन 1 हजार 100 किलो असून वजन वाहून नेण्याची क्षमता 200 किलोहून अधिक आहे. ही कार 200 कि.मी.प्रतितास वेगानं 2500 मीटर उंचीपर्यंत उडू शकते.
सध्याच्या घडीला जगभरातील अनेक देशांमध्ये फ्लाईंग कार्सच्या टेस्ट सुरू आहेत. मात्र यात आघाडी घेतलीय ती स्लोव्हाकियानं. हे नवं तंत्रज्ञान भारतात येण्यासाठी बराच अवधी लागेल. त्यामुळे तुम्हाला फ्लाईंग कारमधून गगनभरारी घ्यायची असेल तर स्लोव्हाकियाचं तिकीट काढावं लागेल.