जैशविरोधात फ्रान्सचं मोठं पाऊल, मसूद अझहरची संपत्ती करणार जप्त
हा निर्णय भारताच्या दहशतवादाविरोधी भूमिकेसाठी फायद्याचा
नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार आणि इतर अनेक दहशतवादी कारवायांमध्ये हात असणाऱ्या मसूद अझहरला फ्रान्सने चांगलाच दणका दिला आहे. रॉइटर्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार शुक्रवारी फ्रान्सच्या सरकारकडून फ्रान्समध्ये असणारी अझहरची सर्व प्रकारची संपत्ती जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फ्रान्सकडून घेण्यात आलेला हा निर्णय भारताच्या दहशतवादाविरोधी भूमिकेसाठी फायद्याचा ठरणार असल्याची प्रतिक्रिया दिली जात आहे.
आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत मसूदच्या नावाचाही समावेश करण्यात यावा, यासाठी आग्रही असणाऱ्या राष्ट्रांमध्ये फ्रान्सचाही समावेश आहे. ब्रिटनसोबतच फ्रान्सनेही ही बाब संयुक्त राष्ट्रांपुढे उचलून धरली आहे. दहशतवादी कारवाया आणि जैश-ए-मोहम्मद या संघटनेला असणारा फ्रान्सचा विरोध आजवर लपून राहिलेला नाही. त्यातच आता मसूदची सर्व संपत्ती जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे आता जैश आर्थिदृष्ट्याही अडचणीत येणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे.
जम्मू काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. या हल्ल्यानंतर जैशविरोधी भूमिका घेत अनेक राष्ट्रांनी दहशतवादाचा निषेध केला. परिणामी ब्रिटन, फ्रान्स या राष्ट्रांकडून पुन्हा मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली.
२००९ आणि २०१६मध्ये भारताने संयुक्त राष्ट्रांत याबाबतचा प्रस्ताव मांडला होता. २०१६ साली पी-थ्री म्हणजे अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स या देशांचं प्रस्तावाला अनुमोदन होतं. त्यानंतर २०१७ साली पी-थ्री देशांनी पुन्हा अशाच आशयाचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीकडे सादर केला होता. मात्र या तीन्ही वेळा चीननं आपला नकाराधिकार वापरून अझहर आणि पर्यायीला वाचवलं होते.