G20 Summit : `ही बोलण्याची पद्धत नाही`; कॅनडाच्या पंतप्रधानांवर भडकले शी जिनपिंग
G20 Summit 2022 : G-20 परिषदेतून समोर आलेल्या व्हिडीओमध्ये शी जिनपिंग कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याशी रागाने बोलत आहेत
Justin Trudeau XI Jinping : इंडोनिशातील (Indonesia) बालीमध्ये यंदाच्या G20 शिखर परिषदेचं (G20 summit) आयोजन करण्यात आलं होतं. दोन दिवसीय G20 राष्ट्रगटाच्या शिखर परिषदेते भारताकडे इंडोनेशियाकडून 'जी-20'चे अध्यक्षपद सोपण्यात आले आहे. G20 ची आगामी शिखर परिषद 9 आणि 10 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. या परिषदेला इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांच्यासह पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi), अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आदी राष्ट्रांचे प्रमुख उपस्थित होते. या परिषदेत सुरुवातीपासूनच रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात (russia ukraine war) चर्चा होती. मात्र परिषदेच्या शेवटच्या दिवशी झालेल्या एका घटनेने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहे.
G20 शिखर परिषदेत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (xi jinping) आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो (justin trudeau) यांच्यातील संभाषण कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आले आहे. शी जिनपिंग यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्याशी झालेल्या भेटीत त्यांच्या पूर्वीच्या बैठकीची बाहेर उघड झाल्याने नाराजी व्यक्त केली. G-20 परिषदेतून समोर आलेल्या व्हिडीओमध्ये शी जिनपिंग कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याशी रागाने बोलत आहेत.
नेमकं काय झालं?
15 नोव्हेंबर रोजी जस्टिन ट्रूडो यांच्यातील भेटीचा व्हिडिओ मीडियावर लीक झाल्यामुळे शी जिनपिंग संतापले होते. जिनपिंग यांनी जस्टिन ट्रुडो यांना तक्रारीच्या स्वरात, माध्यमांना प्रत्येक गोष्टीची माहिती देणे चुकीचे आहे, असे म्हटले. जिनपिंग आणि ट्रुडो यांच्यातील संभाषणाच्या व्हिडिओमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष एका ट्रान्सलेटरद्वारे कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो यांना आम्ही जी काही चर्चा केली ती मीडियावर लीक झाली, ते योग्य नाही, असे सांगितले. त्यावर, कॅनडा मुक्त संवादावर विश्वास ठेवतो, असे ट्रूडो यांनी सांगितले. त्यावर जिनपिंग यांनी, ही बोलण्याची पद्धत नाही, असे म्हटले.
ट्रुडो यांच्या प्रतिक्रियेनंतर, शी जिनपिंग यांनी हसत हसत, "हे छान आहे, परंतु आधी तशी परिस्थिती निर्माण करूया," असे म्हटले. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी हात मिळवले आणि वेगवेगळ्या दिशेने निघून गेले. शी यांच्याशी झालेल्या चर्चेबद्दल विचारले असता, ट्रूडो म्हणाले, "प्रत्येक संभाषण सोपे होणार नाही, परंतु कॅनेडियन लोकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींसाठी आम्ही उभे राहणे अत्यंत महत्वाचे आहे."