Anmol Bishnoi Arrest: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. NIAने अनमोल बिश्नोईवर 10 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनमोल बिश्नोईला अटक करण्यात आली आहे.


कॅलिफोर्नियात ताब्यात घेण्यात आले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईला अमेरिकेतील कॅलिफॉर्निया जवळून अटक करण्यात आले. सध्या अनमोल पोलिसांच्या ताब्यात आहे. प्राथमिक माहितीनुसार, अनमोल हा गँगस्टर असून भारतातील हाय प्रोफाइल प्रकरणात त्याचे नाव समोर आले आहे. मुंबई क्राइम ब्रँचच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनमोल बिश्नोईची चौकशी झाल्यानंतर अमिरिकेतील अधिकारी त्याला सगळ्यात आधी हरदीप सिंह निज्जर हत्या प्रकरणात कॅनडाच्या अधिकाऱ्यांना त्याचा ताबा देऊ शकतात. नंतर भारतीय अधिकाऱ्यांना त्याचा ताबा मिळू शकतो. 


अनमोल बिश्नोई गेल्या वर्षी भारतातून पळून गेला होता. त्याचा भाऊ लॉरेन्स बिश्नोईच्या अटकेनंतर अनमोल बिश्नोई गँगचा प्रमुख बनला होता. अनमोलच्या नावे अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. ज्यात बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबारची घटना. तसंच, 2022मध्ये पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्या प्रकरणातदेखील त्याचे नाव समोर आले आहे. 


या वर्षी ऑक्टोबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली होती. या प्रकरणात संशयितांना अटक करण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू केल्यानंतर काही आठवड्यांनंतर त्याला अमेरिकेत ताब्यात घेण्यात आले. अनमोलवर एनआयएने नोंदवलेले दोन खटले आणि अन्य 18 गुन्हेगारी खटले दाखल आहेत. 


अलीकडेच, अनमोल बिश्नोईची जो कोणी माहिती देईल त्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्याची घोषणा तपास यंत्रणांनी केली होती. सुरुवातीला अनमोल बिश्नोई बनावट पासपोर्टच्या सहाय्याने कॅनडात पळून गेला होता. मुंबई न्यायालयाने त्याच्याविरुद्ध या वर्षी जुलैमध्ये अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. 


या एप्रिलच्या सुरुवातीला सलमान खानच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यातही अनमोलचाही सहभाग होता. अनमोलचा मोठा भाऊ, लॉरेन्स बिश्नोई, जो जवळपास दहा वर्षांपासून संघटित गुन्हेगारीमध्ये प्रमुख व्यक्ती होता, तो सध्या अंमली पदार्थांची तस्करी आणि हिंसक गुन्ह्यांच्या आरोपाखाली गुजरातच्या तुरुंगात बंद आहे.