Unlimited Overdraft: अनेक जण श्रीमंतीचं स्वप्न पाहात असतात. मात्र मेहनतीशिवाय गत्यंतर नाही, हे सरतेशेवटी कळतं. पण कधी कधी नशिबाची साथ मिळाली की, काहीही होऊ शकतं हे आपण अनेकदा ऐकलं आहे. असाच काहीसा प्रकार मलेशियातील मुलीसोबत घडला. हा आश्चर्यकारक योगायोग क्रिस्टीन जियाक्सिन लीसोबत घडला. तरुणी मुळची मलेशियाची असून, मेकॅनिकल इंजिनीअरिंगचा अभ्यास करण्यासाठी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे गेली होती. बँकेच्या एका चुकीमुळे तिच्या खात्यात अचानक कोट्यवधी रुपये आले आणि ती अवघ्या काही सेकंदात कोट्यधीश झाली. वेस्टपॅक बँकेने चुकून क्रिस्टीनच्या खात्यात अमर्यादित ओव्हरड्राफ्ट सुविधा दिली. मग काय अशी सुविधा मिळाली की, कोणाचे पाय जमिनीवर राहतील.  क्रिस्टीननं पैशांची उधळपट्टी करण्यास सुरुवात केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिस्टीननं बँकेला याबाबत कोणतीही माहिती दिली नाही आणि वाटेल तशी खरेदी सुरू केली. आलिशान जीवन जगू लागली. तिने महागड्या ब्रँडचे कपडे आणि दागिने खरेदी केले. पार्ट्यां आणि प्रवासावर भरपूर पैसे खर्च केले आणि एक महागडे अपार्टमेंट विकत घेतले. यादरम्यान तिने सुमारे 2.50 लाख रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केले.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्रिस्टीनने सुमारे 11 महिने खूप पैसे खर्च केले आणि बँकेला याबद्दल माहिती दिली नाही. बँकेला चूक लक्षात येईपर्यंत लीने सुमारे 18 कोटी रुपये खर्च केले होते. या प्रकरणी तिला अटक करण्यात आली मात्र कोर्टात आरोप फेटाळण्यात आले. तिच्या वकिलाने न्यायालयात युक्तिवाद करत सांगितले की, बँकेची चूक असल्याने तिला फसवणुकीसाठी दोषी ठरवता येणार नाही.


सर्व वादानंतर क्रिस्टीन मलेशियाला पळून गेली आहे. तिच्याकडून अधिकाऱ्यांनी सुमारे 10 कोटी रुपये जमा केले असले तरी उर्वरित रक्कम त्यांना मिळू शकली नाही.