UAE मध्ये जोरदार पाऊस, पाण्यात बुडाल्या अनेक महागड्या कार
पुराच्या पाण्याचा फटका. गाड्या आणि रस्त्यांचे मोठे नुकसान
मुंबई : संयुक्त अरब अमिराती, UAE मध्ये गुरुवारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागात पूर आला. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पोस्ट करण्यात आले होते ज्यात शारजाह आणि फुजैराह भागात पुराचं पाण्यातून कशा प्रकारे लोकांना वाचवण्यात आले हे दिसत आहे. या दोन शहरांना पुराच्या पाण्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. विशेषत: फुजेरिया प्रभावित झाला आहे कारण हा डोंगराळ आणि दऱ्यांचा प्रदेश आहे.
दुबई आणि अबुधाबीमध्ये या ठिकाणांपेक्षा कमी पाऊस नोंदवला आहे. अनेक लोक हॉटेल आणि इतर ठिकाणी आसरा घेताना दिसले. ट्विटरवरील व्हिज्युअलमध्ये फुजेरियामध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या पाण्याखाली पूर्णपणे बुडलेल्या दिसत आहेत.
आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये पुरामुळे शहरात कसे नुकसान झाले आहे हे दिसत आहे. खड्डेमय रस्त्यांवर गाड्या फिरताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी रस्ते उखडले आहेत.
खलीज टाईम्सच्या वृत्तानुसार, UAE च्या पूर्व भागात पावसामुळे अचानक पूर आला. त्यामुळे घरांचे नुकसान झाले असून अनेक वाहने वाहून गेली आहेत. लोकांच्या बचावासाठी तैनात असलेल्या लष्कराच्या वाहनांचेही नुकसान झाले.
अमिराती हवामान खात्याने आधीच खराब हवामानाचा इशारा दिला होता. पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याचे सांगण्यात आले.