Hindu Temples Attacked: बांगलादेशमध्ये 14 Hindu मंदिरांची तोडफोड, मूर्तींची नासधूस; हिंदू संतापले
बांगलादेशमध्ये हिंदू मंदिरांवर हल्ला करत मूर्तींची तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अज्ञातांकडून हा हल्ला करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे.
Hindi Idols Vandalised: बांगलादेशमध्ये (Bangladesh) अज्ञातांनी हिंदू मंदिरांवर (Hindu Temple) हल्ला केला आहे. 14 मंदिरांवर हा हल्ला करत असून, मंदिरातील सर्व मूर्तींची तोडफोड (Hindu Idols Vandalised) करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. "अज्ञातांनी अंधाराचा फायदा घेत 14 मंदिरांतील मूर्तांची नासधूस केली आहे," अशी माहिती बालिंदंगी येथील हिंदू समाजाचे नेते बिद्यनाथ बर्मन यांनी दिली आहे.
उपजिल्हा पूजा सेलिब्रेशन काऊन्सिलचे सरचिटणीस बर्मन यांनी सांगितले की, काही मूर्ती पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. तर काही मूर्ती मंदिराच्या ठिकाणी तलावात फेकून देण्यात आल्या होत्या. "यामागे नेमकं कोण आहे हे अद्याप उघड झालेलं नाही. पण तपास पूर्ण करत आरोपींना पकडलं जावं आणि न्याय व्हावा अशी आमची इच्छा आहे," असं बर्मन म्हणाले आहेत.
हिंदू समाजाचे नेते आणि युनिअन परिषदचे चेअरमन समर चॅटर्जी यांनी सांगितलं आहे की, हा परिसर नेहमीच आपल्या जातीय सलोख्यासाठी ओळखला जातो. याआधी अशी कोणतीही निंदनीय घटना घडलेली नाही. "याठिकाणी मुस्लीम समाज बहुसंख्यांक असून त्यांचा हिंदूंसह कोणताही वाद नाही. यामागे नेमके आरोपी कोण आहेत हे आम्हालाही समजत नाही आहे," असं ते म्हणाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आणि रविवादरम्यान हे हल्ले झाले आहेत. ठाकूरगावचे पोलीस प्रमुख जहांगीर हुसेन यांनी एका मंदिराच्या ठिकाणी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की "देशातील शांतता बिघडवण्यासाठी हा आकस्मिक हल्ला केल्याचं स्पष्टपणे दिसत आहे".
हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास सुरु करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. "हा हल्ला शांतता आणि जातीय सलोख्याच्या विरोधात रचलेल्या कटाचा भाग आहे. हा गंभीर गुन्हा आहे आणि गुन्हेगारांना कारवाईचा सामना करावा लागेल," असंठाकूरगावचे उपायुक्त किंवा प्रशासकीय प्रमुख महबुबुर रहमान यांनी म्हटलं आहे.