कधी संपणार कोरोनाचं संकट, WHO नं दिली महत्त्वाची माहिती
अतिशय झपाट्यानं वाढणारं हे संकट पाहता...
जिनिव्हा: साधारण गेल्या वर्षाच्या अखेरपासून साऱ्या विश्वावर coronavirus कोरोनाचं सावट आलं आणि पाहता पाहता सारी परिस्थिती बदलली. कोरोना व्हायरसनं जवळपास साऱ्या जगाला विळखा घातला आणि सारी गणितं चुकल्याचं जागतिक संघटनांच्याही लक्षात आलं.
अतिशय झपाट्यानं वाढणारं हे संकट पाहता अखेर कोरोनाचं हे संकट नेमकं टळणार कधी टळणार हाच प्रश्न सर्वांच्या मनात घर करु लागला. अखेर या प्रश्नाचं उत्तर जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांकडूनच देण्यात आलं आहे.
टेड्रोस एडहोम घेब्येयियस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी दिलेल्या माहितीनुसार किमान पुढील दोन वर्षांनंतरच कोरोनाचं हे संकट टळणार आहे. टेड्रोस यांच्या माहितीनुसार या महामारीमुळं आरोग्य आणि अर्थव्यवस्था या दोन गोष्टींचं महत्त्वं आपल्याला ठाऊक झालं आहे. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी राबवण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या उपायांविषयी प्रशंसा करत या उपायांची कोरोनाचं संक्रमण रोखण्यात मदत केल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. पण, त्याचवेळी त्यांनी हा दीर्घकालीन उपाय नसल्याचा मुद्दाही मांडला.
प्रत्येक व्यक्ती, कुटुंब, समाज आणि राष्ट्रानं त्यांच्या स्तरावर याबाबतच निर्णय घ्यावा असंही ते म्हणाले. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सध्याच्या घडीला लसींचं संशोधन सुरु असल्याचं म्हणत WHO प्रमुखांनी येत्या दोन वर्षांमध्ये या वैश्विक महामारीचं संकट टळेल असा अंदाज वर्तवला. १९१८ मध्ये आलेल्या स्पॅनिश फ्ल्यूच्या साथीचं उदाहरण देत त्यांनी सध्याच्या घडीला हाताशी असणाऱ्या तंत्राची तुलना केली. शिवाय येत्या काळात कोरोना संकटावर मात करण्याची आशाही व्यक्त केली.