Job News : कामाचे तास, कामाचं स्वरुप, मिळणारा पगार आणि न संपणारा तणाव... हीच परिस्थिती सध्याच्या कॉर्पोरेट किंवा खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपुढं कैक आव्हानं उभी करत आहे. सुरुवातीला चांगली वाटणारी नोकरी अनेक अपेक्षांच्या दबावाखाली  कशा पद्धतीनं या कर्मचाऱ्यांना चिरडतेय या साऱ्याची प्रचिती अनेकदा अनेक माध्यमांतून सध्या पाहायला मिळत आहे. याच कॉर्पोरेट क्षेत्राचा एक भीतीदायक चेहरा नुकताच जगासमोर आला आहे. (Corporate Jobs)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्मचाऱ्यानं नोकरी सोडावी यासाठी चीनमधील एका कंपनीनं क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडत या कर्मचाऱ्याला कथित स्वरुपात एका अंधाऱ्या खोलीत डांबलं. कामावरील वादामुळं जवळपास चार दिवस त्याला या खोलीतच ठेवण्यात आलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे या कर्मचाऱ्याच्या दिलेल्या वागणुकीनंतर ज्यावेळी हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं तेव्हा Guangzhou Duoyi Network Co. Ltd. या कंपनीकडूनच घडल्या प्रकरणाची माहिती देण्यात आली. 


त्या कर्मचाऱ्यासोबत नेमकं काय घडलं होतं? 


डिसेंबर 2022 मध्ये  Liu नावाच्या कर्मचाऱ्याला आपल्याला कंपनीच्या सिस्टीममध्ये Login करता येत नसल्याची बाब लक्षात आली. ज्यानंतर या साऱ्याची प्रदीर्घ चर्चा त्याच्या राजीनाम्यावर येऊन थांबली. ज्यानंतर या कंपनीनं Liu ला त्याच्या नेहमीच्या कामाच्या जागेपासून वेगळ्या जागेवर पाठवलं आणि तिथं त्याला प्रशिक्षणात सहभागी होण्यास सांगितलं. 


Liu ला ज्या खोलीत पाठवलं होतं तिथं वीजपुरवठा नसल्यामुळं काळाकुट्ट अंधार होता. सहकारी दूरच पण, इथं एक खुर्ची आणि एका टेबलाशिवाय दुसरं काहीही नव्हतं, असं वृत्त South China Morning Post नं प्रसिद्ध केलं. 


या कर्मचाऱ्यासोबत पुढे काय घडलं? 


प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार ते चार दिवस Liu ला कोणतंही काम देण्यात आलं नाही. त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला होता. हो, पण या रुममधून अधेमधे बाहेर पडण्याची आणि या शिक्षारुपी कामावरून घरी जाण्याची मुभा मात्र त्याला होती. पाचव्या दिवशी काहीतरी गोंधळतंय, याची कुणकूण या कर्मचाऱ्याच्या पत्नीच्या लक्षात आलं आणि तेव्हाच या कर्मचाऱ्याला कामावरून काढण्यात आल्याचं अधिकृतरित्या सांगण्यात आलं. 


हेसुद्धा वाचा : बापरे! एअर इंडियाच्या 600 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात? कंपनी केव्हाही सांगू शकते... 


कंपनीच्या मते Liu नं काही नियमांची पायमल्ली केली असून, कामाच्या तासांदरम्यान त्याच्यावर अश्लील छायाचित्र पाहणाऱ्याचा आरोप करण्यात आला. इतकंच नव्हे, तर त्यानं बंदी असणाऱ्या वेबसाईट्स सुरु केल्याचा आरोपही कंपनीनं केला. दरम्यान या कंपनीमध्ये गेम आर्ट एडिटर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनं मात्र हे फोटो आपल्या कामाचा भाग असल्याचं म्हटलं. 


न्यायालयात हे प्रकरण पोहोचल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्याच्याच बाजूनं निर्णय देत त्याचा अंधाऱ्या खोलीत डांबणं म्हणजे कामकार हक्क नियमांची पायमल्ली असल्याचं अधोरेखित करत इथं नोकरीच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना पूरक वातावरण देणं संस्थेचं काम असतं असं खडसावून सांगितलं. मे 2024 मध्ये सदर प्रकरणात झालेल्या सुनावणीमध्ये सिचुआन प्रांतात असणाऱ्या जिल्हास्तरीय न्यायालयानं कर्मचाऱ्याच्या बाजूनं निकाल देत सदर कंपनीनं त्याला दिलेल्या व्यवहारासाठी  380,000 युआन म्हणजेच US$52,200 इतकी रक्कम नुकसानभरपाईच्या स्वरुपात देण्याचे आदेश दिले. कंपनीनं मात्र निर्णय विरोधात गेल्याचं पाहत आपल्या कामगार कायद्यामध्येच काही त्रुटी असल्याचं म्हणत या निर्णयावर नाराजीचा सूर आळवला होता.