भारताने पुरावे दिल्यास कारवाई करु, हल्ला केल्यास प्रत्यूत्तर देऊ - इम्रान खान
पाकिस्तानची भारताला धमकी
कराची : १४ फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले होते. यानंतर जगभरातून पाकिस्तानवर जोरदार टीका सुरु झाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या हल्ल्यावर आज प्रतिक्रिया दिली. इम्रान खान यांनी म्हटलं की, भारत सरकारने पाकिस्तानवर आरोप केले आहेत. पण सऊदी अरबचे प्रिंस पाकिस्तान दौऱ्यावर असल्याने सगळं लक्ष तिकडे होतं. जेव्हा क्राउन प्रिंस परतले तेव्हा आता उत्तर देत आहे. भारत सरकार कोणत्याही पुराव्या विनाच पाकिस्तानवर आरोप करत आहे. पाकिस्तान असं का करेल आणि याचा आम्हाला काय फायदा असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. 'जर भारत सरकार आम्हाला पुरावे देईल तर आम्ही या प्रकरणाची चौकशी करायला तयार आहोत.' असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
इम्रान खान यांनी पुढे म्हटलं की, 'मागील १५ वर्षापासून आम्ही दहशतवादाविरोधात लढाई लढत आहोत. आम्हाला दहशतवादापासून कोणताच फायदा नाही. प्रत्येक वेळी काश्मीरमध्ये काहीही झालं तरी पाकिस्तानवर आरोप केले जातात. भारताला कोणतीही चौकशी करायची असेल तर आम्ही तयार आहोत. आम्ही दहशतवादावर चर्चा करण्यासाठी तयार आहोत. आम्हाला ही गोष्ट संपवायची आहे. एक नवा विचार पुढे आला पाहिजे. काश्मीरच्या तरुणांमधून मृत्यूची भीतीच निघून गेली आहे.'
पुलवामा हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने घेतली होती. यानंतर भारताने पाकिस्तानला दिलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा देखील काढून घेतला आहे. शिवाय पाकिस्तावर आता २०० टक्के टॅक्स लावण्यात आला आहे. पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेरण्यासाठी देखील भारताने तयारी केली आहे. भारत सध्या अनेक देशांची याबाबत चर्चा करत आहे. अमेरिका, जर्मनीसह अनेक मोठ्या देशांशी दहशतवादाविरोधात एकत्र येण्याची आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी चर्चा सुरु आहे.
मंगळवारी लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने संयुक्त पत्रकार परिषद घेत पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानची आर्मी आणि आयएसआयचा हात असल्याचं म्हटलं आहे.