अभिनंदन! भारतीय वैमानिकाची उद्या सुटका, पाक पंतप्रधानांची संसदेत घोषणा
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची पाकिस्तान संसदेत घोषणा
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भारतीय वैमानिक अभिनंदन वर्थमान यांना उद्या सोडण्यात येणार आहे, अशी घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तान संसदेत केली. अभिनंदन उद्या (शुक्रवारी) वाघा बॉर्डरवरून भारतात दाखल होणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, भारताच्या म्हणण्यानुसार कोणत्याही अटीविना पाकिस्ताननं भारतीय वैमानिकाला सोडण्यासाठी तयारी दर्शवलीय. भारतीय वैमानिकाची सुटका करुन तणाव निवळणार असेल तर त्याला सोडायला तयार असल्याची भूमिका गुरुवारी सकाळी पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानं जाहीर केली होती.
गुरुवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान भारत-पाकिस्तानच्या ताणलेल्या संबंधांवर पाकिस्तानच्या संसदेत बोलत होते. पाकिस्तानला केवळ शांतता हवीय. बुधवारी आपण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मी हे भारताला सांगू इच्छितो की ही परिस्थिती पुढे वाढवू नका, अन्यथा पाकिस्तानलाही त्याला प्रत्यूत्तर द्यावचं लागेल... आमचा तणाव निवळण्याचा प्रयत्न हा आमचा कमकुवतपणा समजला जाऊ नये, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.
आपण भाषण संपवून खाली बसल्यानंतर दोन मिनिटांनी इम्रान खान पुन्हा उभे राहिले. आणि 'आम्ही हेही जाहीर करू इच्छितो की पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय वैमानिकाला उद्या सोडण्याचा निर्णय पाकिस्ताननं घेतलाय' असं त्यांनी संसदेत जाहीर केलं.
भारतानं मंगळवारी पाकिस्तानच्या एलओसीवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर चवळताळलेल्या पाकिस्ताननं बुधवारी सकाळी भारतावर विमानांच्या सहाय्यानं हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. परंतु, भारतानं दिलेल्या प्रत्यूत्तरासमोर त्यांचा हा प्रयत्न फसला. भारत - पाकिस्तान दरम्यान तणाव इतका वाढला की १९७१ नंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांनी एकमेकांची विमानं पाडली आणि हवाई हद्द ओलांडण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान पाकिस्ताननं एका भारतीय वैमानिकाला ताब्यात घेतलं होतं.
पाकिस्तानच्या दबावतंत्राला न जुमानता, आधी दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करा मगच बोलू अशी भूमिका भारतानं जाहीर केली होती. सोबतच अभिनंदनची कुठल्याही अटींशिवाय तात्काळ सुटका करण्यासाठीही भारतानं पाकिस्तानला बजावलं होतं. पाकिस्तान कंदाहारप्रमाणे दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा कोणत्याही दबावाला भारत बळी पडणार नाही, पाकिस्तानने तातडीने वैमानिक अभिनंदनला भारतात परत पाठवावं... आधी दहशतवाद्यांवर कारवाई करा, मगच बातचीत करू, अशीच भारताची पाकिस्तान संदर्भात भूमिका राहणार आहे. कुठलीही बोलणी करण्याआधी पाकिस्ताननं दहशतवादाविरोधात तातडीनं, कठोर आणि विश्वासार्ह कारवाई करावी, अशी भूमिका भारतानं घेतली होती. इम्रान खान दहशतवादविरोधी कारवाईच्या ज्या वल्गना करतात, जे बोलतात, ते त्यांनी प्रत्यक्ष करुन दाखवावं, असं आव्हानही भारतानं पाकिस्तानला दिलं होतं.