नवी दिल्ली : कुलभूषण जाधवप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताच्या बाजूने निकाल दिला आहे. पण अद्यापही पाकिस्तान आपल्या कुरापतींपासून मागे हटताना दिसत नाही आहे. पाकिस्तानातील माध्यम आयसीजेच्या या निर्णयाला स्वत:चा विजय मानत आहेत. याच पार्श्वभुमीवर पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. इम्रान यांनी आयसीजेच्या निर्णयाचे स्वागत केले. कुलभूषण यांची सुटका करण्याबद्दल आयसीजेने सांगितले नसल्याचे ते म्हणाले. पाकिस्तान जनतेविरोधातील कारवाईत ते दोषी आहेत. पाकिस्तान याप्रकरणी कायदेशीर कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१५-१ या बहुमताच्या आधारावर न्यायाधिशांनी भारताच्या बाजुने हा निकाल दिला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर पाकिस्तानने याप्रकरणी पुनर्विचार करावा. कुलभूषण जाधव यांची फाशीच्या शिक्षेवर स्थगिती दिली जावी. त्यांना काऊंसिलर सुविधा उपलब्ध करावी असे आयसीजेने म्हटले आहे. यामुळे कुलभूषण जाधवांना राजनैतिक मदत देण्याचा मार्ग मोकळा झालाय. तसंच त्यांच्या फाशीच्या शिक्षेवर स्थगिती कायम ठेवण्यात आलीय. या सुनावणी दरम्यान न्यायालयानं पाकिस्तान मानवाधिकारांवरूनही फटकारलं. कुलभूषण जाधवांच्या प्रकरणात मानवाधिकारांचं उल्लंघन झाल्याचा ठपका न्यायालयानं पाकिस्तानवर ठेवलाय. तसंच व्हिएन्ना कराराचं पाकिस्तानकडून उल्लंघन झाल्याचा उल्लेखही आंतराराष्ट्रीय न्यायालयानं केलाय.



निर्णयानंतर माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाचं स्वागत केलंय. भारताच्या या विजयाचं श्रेय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देत शुभेच्छा दिल्यात. 'कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचं मनापासून स्वागत करते. हा भारतासाठी मोठा विजय आहे'. सोबतच, 'कुलभूषण जाधव प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देते' असंही त्यांनी यावेळी म्हटले आहे.