भविष्यात युद्धाचे स्वरूप बदलणार, दहशतवादी करणार रासायनिक हल्ले?
जगात भविष्यात रासायनिक किंवा जैविक हल्ले होण्याची शक्यता.
मुंबई : कोरोनाच्या महामारीनं अख्ख्या जगात हाहाकार उडाला.. यापुढं दहशतवादी संघटना जैविक अस्त्र म्हणून कोरोना व्हायरसचा वापर करू शकतात, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कोरोनानं जगभरात आतापर्यंत 20 लाखांहून अधिक बळी घेतले आहेत. त्यामुळं भविष्यात कोरोना व्हायरसचा वापर दहशतवादी रासायनिक हल्ल्यासाठी करू शकतात, अशी भीती सुरक्षा तज्ज्ञांना वाटते आहे.
कोरोनापुढं झुकणार दुनिया?
जैविक अस्त्र म्हणून कोरोना व्हायरसचा गैरवापर होऊ शकतो, अशी भीती तज्ज्ञांना वाटतेय. भविष्यात युद्धाचे स्वरूप बदलणार असून, रासायनिक किंवा जैविक हल्ले जगात ठिकठिकाणी होऊ शकतात, अशी शक्यता शस्त्रास्त्र विशेषज्ञ हामिश डी ब्रेटन गॉर्डन यांनी व्यक्त केली आहे.
'जैविक अस्त्र' म्हणून कोरोनाचा गैरवापर?
याआधी कोरोना व्हायरस म्हणजे चीननं बनवलेलं जैविक अस्त्र असल्याचा आरोप झाला होता. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीमध्ये कोरोना व्हायरसचा जन्म झाला, असा संशय व्यक्त केला गेला. मात्र जागतिक आरोग्य संघटनेनं केलेल्या चौकशीत याबाबतचे ठोस पुरावे आढळले नाहीत.. मात्र कोरोनाच्या निमित्तानं अशाप्रकारच्या जैविक अस्त्राचा भविष्यातील युद्धासाठी वापर होऊ शकतो, हे स्पष्ट झाल्याचं मानलं जातं आहे.