नवी दिल्ली : जगभरातल्या सुमारे २०० देश आणि प्रदेशांत कोरोनानं विळखा घातला असून महासत्ता अमेरिकेत आता चीनपेक्षाही अधिक म्हणजे जगातील सर्वाधिक रुग्ण आहेत. अमेरिकेतील रुग्णांची संख्या ८५ हजारावर पोहचली असून मृतांचा आकडाही १३०० च्या पुढे गेला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनमध्ये कोरोनाची साथ आटोक्यात आली असताना आता युरोप आणि अमेरिकेत कोरोनाचा कहर सुरु आहे. अमेरिका आणि चीननंतर इटलीमध्ये ८० हजारावर रुग्ण असून मृतांचा अकडा ८२१५ वर पोहचला आहे. इटलीनंतर स्पेनमध्ये ५७७०० हून अधिक रुग्ण असून मृतांचा आकडा ४३६५ इतका झाला आहे. चीनमध्ये कोरोनाने ४२९२ बळी गेले आहेत. इराणमध्ये २२३४ बळी गेलेत. फ्रान्समध्ये १६९६ रुग्णांचा मृत्यू झालाय. ब्रिटनमध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून मृतांचा आकडा पाचशेच्या वर जाऊन ५७८ पर्यंत पोहचला आहे. नेदरलँडमध्ये ४३४, जर्मनीमध्ये २६७ आणि बेल्जियममध्ये २२० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


कोरोनाचा वेग आणखी वाढला


कोरोनाचे जगभरात ५ लाखांवर रुग्ण झाले आहेत. पहिल्या तीन महिन्यांत १ लाख रुग्ण झाले होते. पुढच्या १२ दिवसांत १ लाख रुग्ण वाढले. त्यानंतर अवघ्या ४ दिवसांत आणखी एक लाख रुग्ण वाढले. तर त्यानंतर एक लाखांचा टप्पा अवघ्या दीड दिवसातच पार केला आहे. हा वेग अजूनही कायम असून आणखी दीड दिवसांत आकडा ५ लाखांवर पोहचला आहे.


अमेरिकेत कोरोनामुळे बेकारी, आर्थिक संकट


महासत्ता अमेरिकेला कोरोनानं इतर देशांप्रमाणेच संकटात टाकले आहे. अमेरिकेत बेकारी वाढली असून बेरोजगारांची संख्या ३३ लाखांवर पोहचली आहे. अमेरिकेतील बेकारी अभूतपूर्व असून याआधी १९८२ साली ६ लाख ९५ हजार बेरोजगार नोंदवले गेले होते.


अमेरिकेचं २ ट्रिलियन डॉलर्सचं पॅकेज


अमेरिकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ट्रम्प प्रशासनानं २ ट्रिलियन डॉलर्सचं पॅकेज तयार केलं असून शुक्रवारी त्यावर मतदान होणार आहे.