नवी दिल्ली : पाकिस्तानातील आयात मालावर भारताकडून तब्बल २०० टक्के कस्टम्स ड्यूटी लागू करण्यात आली आहे. तसेच अतिविशेष राष्ट्राचा दर्जा काढून घेतल्यानंतर भारताचा पाकिस्तानवर पहिला आघात आहे. जम्मू काश्मीरमधल्या पुलवामातल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानला पहिला दणका दिला आहे. पाकिस्तानातून भारतात आयात होणाऱ्या सर्व मालावरची कस्टम्स ड्यूटी, भारत सरकारने तब्बल २०० टक्क्यांनी वाढवली आहे. पाकिस्तानला बहाल केलेला अतिविशेष राष्ट्राचा दर्जा काढून घेतल्यानंतर, भारत सरकारने तडकाफडकी हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानसाठी व्यापार क्षेत्रातला हा मोठा आघात मानला जात आहे. याचे परिणाम पाकिस्तानातील अर्थव्यवस्थेवर होणार आहेत. 


पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तांना बोलावून घेतले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना केंद्र सरकारने चर्चेसाठी बोलावलं आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात केंद्र सरकार भारतीय उच्चायुक्तांशी सल्लामसलत करणार आहेत. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सगळा देश हादरला. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा भ्याड हल्ला केला. या हल्ल्याचे वृत्त समजताच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल हेदेखील त्यांचा भूतान दौरा अर्धवट सोडून भारतात परतले. तसेच शुक्रवारीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्य दलाला या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य आहे असे म्हटले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करता पाकिस्तानातील उच्चायुक्तांना भारतात बोलावणे हीदेखील महत्त्वाची बाब मानली जाते आहे.



दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या भ्याड आत्मघाती दहशतवादी हल्ल्याप्रकरणी सुरक्षादलाने कारवाई सुरू केली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या कटात सहभाग असल्याच्या संशयावरून जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी आज सात जणांना ताब्यात घेतले आहे.ताब्यात घेतलेल्या सातही जणांकडे कसून चौकशी केली जात आहे. पुलवामा जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई करून या सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या भीषण दहशतवादी हल्ल्याचा कट पुलवामाच्या त्राल परिसरात रचण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.


२०१६ मध्ये हिजबुलचा टॉप कमांडर बुरहान वानीचा खात्मा त्राल येथेच झाला होता. त्याच्या खात्म्यानंतर पुढील चार महिने काश्मीर खोऱ्यामध्ये तणावपूर्ण परिस्थिती होती. या हल्ल्याची योजना पाकिस्तानचा नागरीक आणि जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी कामरान याने तयार केली होती असा पोलिसांना संशय आहे. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा, अवंतीपुरा आणि त्राल भागात तो जैशचं नेटवर्क सांभाळतो, अशी माहितीही पोलीस सूत्रांनी दिली असून त्याचाही शोध घेतला जात आहे.